कळमेश्वरात बोगस लाभार्थी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:10+5:302021-02-16T04:10:10+5:30

विजय नागपुरे कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, आदी योजना राबविल्या जातात. ...

How many bogus beneficiaries are there in Kalmeshwar? | कळमेश्वरात बोगस लाभार्थी किती?

कळमेश्वरात बोगस लाभार्थी किती?

विजय नागपुरे

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, आदी योजना राबविल्या जातात. या योजनेमध्ये १५ हजार ८९५ लाभार्थी लाभ घेत असून, या योजनेवर दर महिन्याला एक कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येते. सध्या बोगस लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात येत असून, तहसील कार्यालयाकडे तपासणी अहवाल प्राप्त व्हायचा आहे, अशी माहिती नायब तहसीलदार योगिता दराडे यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग या सारख्या आजारांमुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणाऱ्या पुरुष व महिला, निराधार विधवा, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, सिकलसेल ग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. २०२० च्या नोंदणीनुसार अशा लाभार्थ्यांची संख्या तालुक्यात १५ हजार ८९५ वर पोहोचली आहे. सध्या तालुक्यात बोगस लाभार्थी शोधमोहीम राबविणे सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात येत आहे. त्यांचा अहवाल कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर बोगस लाभार्थ्यांचा खरा चेहरा शासनापुढे येणार आहे.

संजय गांधी योजना (परितक्त्या)

परितक्त्या महिलांना हजार रुपये महिना, एक अपत्य असेल तर ११००, दोन अपत्य असेल तर १२०० रुपयांचा निधी दरमहा मिळतो.

संजय गांधी योजना (अनाथ)

या योजनेमध्ये निराधार असलेल्या मुलांना १८ वर्षांपर्यंत दरमहा हजार रुपये लाभ दिला जातो.

संजय गांधी योजना (घटस्फोटित)

घटस्फोटित महिलांनी तसा बाँड कार्यालयाला सादर करावा लागतो. त्यांना दरमहा हजार रुपये लाभ दिला जातो.

संजय गांधी योजना (दिव्यांग)

या योजनेत दिव्यांगांना लाभ मिळतो. दरमहा हजार रुपये. एक अपत्य ११०० रुपये, दोन अपत्य १२०० रुपये दिले जातात.

श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना (विधवा)

योजनेत मुलांनी न सांभाळणाऱ्या वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना दरमहा हजार रुपये दिले जातात. यात केंद्र आणि राज्य शासन मदत करते.

योजनेचे नाव लाभार्थी संख्या

संजय गांधी योजना ३४७१

श्रावण बाळ योजना १०५१९

इंदिरा गांधी योजना १९०५

एकूण लाभार्थी १५८९५

--

लाभार्थ्यांचा दरवर्षी गोषवारा घेतला जातो. लाभार्थी हयात आहे की नाही याची शहानिशा करण्यात येते. लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. तलाठ्याकडून अहवाल मागितला जातो. लाभार्थी बोगस आढळल्यास अनुदान थांबविण्यात येते.

- योगिता दराडे

नायब तहसीलदार (संजय गांधी योजना)

Web Title: How many bogus beneficiaries are there in Kalmeshwar?