बजाज यांना दिलेले आश्वासन पाळणार कसे?

By Admin | Updated: November 16, 2015 02:42 IST2015-11-16T02:42:17+5:302015-11-16T02:42:17+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आणि कामासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधीदेखील मिळाला.

How to keep the promise given to Bajaj? | बजाज यांना दिलेले आश्वासन पाळणार कसे?

बजाज यांना दिलेले आश्वासन पाळणार कसे?

नागपूर विद्यापीठ : ‘ग्रीन’ इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवातच नाही
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आणि कामासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधीदेखील मिळाला. दानदाते राहुल बजाज यांना दोन वर्षांनी नव्या इमारतीतून विद्यापीठाचा कारभार सुरू होईल असे आश्वासनदेखील देण्यात आले. परंतु भूमिपूजन होऊन दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असून प्रशासकीय अडचणीमुळे प्रत्यक्षात बांधकामाच्या ठिकाणी एक वीटदेखील रचण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपये दाननिधी दिलेल्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाला प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.
‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ््या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंंबर रोजी याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राहुल बजाज यांनी हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे व १ आॅक्टोबरपासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल असे प्रतिपादन केले होते. तर ही ‘स्मार्ट’ व ‘ग्रीन’ इमारत पेपरलेस असेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील यासंदर्भात आश्वासन दिले होते.
परंतु हा समारंभ होऊन दीड महिना झाला असून प्रत्यक्षात येथे कुठल्याही कामाची सुरुवात झालेली नाही. या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या आराखड्याला मनपाची पूर्ण मंजुरी अद्याप मिळालेली नाही. सध्या विद्यापीठाला तात्पुरती मंजुरीच मिळालेली असून पूर्ण मंजुरीसाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यानंतर इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेलादेखील वेळ लागण्याची शक्यता आहे. ही इमारत ‘ग्रीन’ व ‘पेपरलेस’ राहणार असून बांधकामाचे क्षेत्र पाहता जर दर्जेदार बांधकामासाठी नामांकित व अनुभवी कंत्राटदराला काम मिळेल तरच वेळेत काम होणे शक्य आहे.
अन्यथा उरलेल्या २२ महिन्यांत पूर्ण प्रक्रिया होऊन इमारतीत प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

जागेच्या नकाशात नदी-नाला
संबंधित जागा ही प्रशासनाच्या नोंदींमध्ये ‘हेरिटेज’ जागा आहे. मनपा प्रशासनाकडे असलेल्या नकाशात या ठिकाणी नदी-नाला दाखविण्यात आला होता. त्यामुळे या इमारतीच्या नकाशाला मंजुरी मिळण्यास तांत्रिक अडचण आली. संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली व तेथे कुठलीही नदी किंवा नाला नसल्याची खात्री करून घेतली. या तांत्रिक समस्येमुळे प्रशासकीय कामाला उशीर झाला आहे. परंतु या इमारतीच्या कामावर देखरेख करण्यासाठी विशेष पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे व मंजुरी मिळाली की पुढील कामाला सुरुवात होईल अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

Web Title: How to keep the promise given to Bajaj?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.