कशी सुधारणार विद्यापीठाची गुणवत्ता?
By Admin | Updated: November 19, 2015 03:44 IST2015-11-19T03:44:00+5:302015-11-19T03:44:00+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात अनेक संलग्नित विभागांमध्ये संशोधनाची पातळी हवी तशी वाढलेली नाही.

कशी सुधारणार विद्यापीठाची गुणवत्ता?
राष्ट्रीय पातळीवर संस्थेचा प्रस्ताव धूळीत : उदासीन भूमिकेमुळे आश्चर्य
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात अनेक संलग्नित विभागांमध्ये संशोधनाची पातळी हवी तशी वाढलेली नाही. राष्ट्रीय स्तरावरील पुरातत्त्व अभ्यास संस्था ‘आयजीएनसीए’ने (इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस्) महाराष्ट्रातील एका प्रकल्पासाठी विद्यापीठाकडे सहकार्य मागितले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना यामुळे संशोधन आणि प्रत्यक्ष अभ्यासाची चांगली संधी मिळाली असती. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून यासंबंधातील प्रस्ताव धूळखात पडला आहे. विद्यापीठाची अशी उदासीन भूमिका पाहता दर्जा कसा सुधारेल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
‘आयजीएनसीए’कडून संपूर्ण देशात पाषाणांपासून बनलेल्या प्राचीन कलाकृतींची माहिती संकलित करण्यात येत आहे. आजच्या तारखेत देशातील आठ राज्यांमध्ये संस्थेचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात अजूनपर्यंत काम सुरू झालेले नाही. राज्यातील कामाचे समन्वयक म्हणून विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.सुभाष साहूचे नाव ‘आयजीएनसीए’ने प्रस्तावित केले होते. यासंदर्भातील प्रस्ताव संस्थेतर्फे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आले होते. परंतु विद्यापीठातीलच एका अधिकाऱ्यांसोबत मतभेदामुळे या प्रस्तावाला अद्याप कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही. विद्यापीठाने उत्तर देण्याचे सौजन्यदेखील न दाखविल्याची खंत ‘आयजीएनसीए’चे प्रकल्प संचालक डॉ.बी.एल.मल्ला यांनी बोलून दाखविली.
आश्चर्याची बाब म्हणजे जागतिक वारसा आठवड्यानिमित्त पुरातत्त्व विभागाचे दोन दिवसीय प्रदर्शन सुरू होणार असूून याचे उद्घाटन कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे करणार आहेत. यासंदर्भात कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)