‘हजार रुपयात कसा संसार व्हईन जी’
By Admin | Updated: December 11, 2014 00:50 IST2014-12-11T00:50:03+5:302014-12-11T00:50:03+5:30
कमावत्या पतीचा हात निकामी झाल्यामुळे त्याच्याकडून काम होत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलगाही १२ वीनंतर शिक्षणास मुकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या कामात खूप मेहनत

‘हजार रुपयात कसा संसार व्हईन जी’
लताबाईची व्यथा : हलाखीच्या परिस्थितीमुळे अडले मुलाचे शिक्षण
दयानंद पाईकराव -नागपूर
कमावत्या पतीचा हात निकामी झाल्यामुळे त्याच्याकडून काम होत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलगाही १२ वीनंतर शिक्षणास मुकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या कामात खूप मेहनत करूनही महिन्याकाठी एक हजार रुपये पदरात पडतात. ‘यवढ्या कमी पैशात कसा संसार व्हईन जी’, अशा शब्दात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बेंबळा (बु.) येथील लता ठाकरे (४७) या महिलेने आपली व्यथा मांडली.
आयटकच्यावतीने बुधवारी अंगणवाडीतील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला. मोर्चात अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बेंबळा (बु.) येथील लता गुणवंत ठाकरे (४७) ही महिला सामील झाली होती. लताबाईचे पती गुणवंत ठाकरे ६० वर्षांचे आहेत. ते शेतीवर मजुरी करायचे. परंतु एका भांडणात त्यांचा हात निकामी झाल्यामुळे आता त्यांच्याकडूनही काम होत नाही. त्यांचा मुलगा सतीश (२८) हा बारावीपर्यंत शिकला. वडिलांची मजुरी बंद झाल्यामुळे आता संसाराची जबाबदारी लताबाई आणि त्यांचा मुलगा सतीशवर येऊन पडली. शालेय पोषण आहार तयार करण्याचे काम त्या करतात. यात सुरुवातीला महिन्याचे फक्त ३०० रुपये मिळायचे. चार वर्षांपासून हे मानधन एक हजार रुपये करण्यात आले. परंतु महागाईच्या काळात कितीही काटकसर केली तरी एक हजार रुपयात संसार चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांचा मुलगा सतीशने शिक्षण अर्धवट सोडून तो सुद्धा मजुरीच्या कामाला लागला. लताबाई आयटकच्या मोर्चात सहभागी झाल्या. आपल्याला शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी सकाळी १० वाजताच अंगणवाडीत जावे लागते. तेथे साफसफाई, वर्ग स्वच्छ करून आहार बनविणे, भांडी धुणे ही कामे करावी लागत असून त्यासाठी दुपारी ४ वाजत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मरमर करून पदरात पडतात फक्त एक हजार. एवढ्या कमी रकमेत काय करणार, असा सवाल त्यांनी चिंताग्रस्त चेहऱ्याने उपस्थित केला. शासनाने किमान पाच हजार रुपये तरी मानधन केल्यास संसारात हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)