तर कसे मिळेल सुरक्षा कवच ?
By Admin | Updated: March 1, 2016 02:38 IST2016-03-01T02:38:51+5:302016-03-01T02:38:51+5:30
उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी ...

तर कसे मिळेल सुरक्षा कवच ?
आपत्ती निवारण योजना : अग्निशमन विभागापुढे आव्हान: यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभाव
नागपूर : उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरासाठी आपत्ती निवारण योजना तयार के ली आहे. परंतु अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे आपत्ती निवारण योजना राबविण्याचे आव्हान या विभागापुढे उभे ठाकले आहे.
या योजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सुधारणा करून त्याची अंमलबजावणी के ली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.
१९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पद निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु आजही ५ केंद्रांना मंजुरी असून ३ मंजुरीविना सुरू आहेत.
विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून १४६ पदे रिक्त आहेत. आजच्या लोकसंख्येचा विचार करता ८२२ कर्मचाऱ्यांची विभागाला गरज आहे म्हणजेच विभागात ५५७ कर्मचारी कमी आहेत.
२४ मीटरहून अधिक उंचीवरील इमारतीतील आग आटोक्यात आणणारी अत्याधुनिक यंत्रणा विभागाकडे नाही. टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल)खरेदीचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे. परंतु यातूनही समस्या सुटणार नाही. हायड्रोलिकसारख्या यंत्रसामग्रीचे आयुष्य संपल्याने विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)