कसा मिळेल गुन्हेपीडितांना न्याय?
By Admin | Updated: March 3, 2017 02:20 IST2017-03-03T02:20:47+5:302017-03-03T02:20:47+5:30
आरोपींचे रक्ताळलेले कपडे रासायनिक परीक्षणाविना तब्बल महिनाभर पोलीस ठाण्याच्या मालखान्यात पडून राहिल्याने

कसा मिळेल गुन्हेपीडितांना न्याय?
आरोपी निर्दोष : आरोपींचे रक्ताळलेले कपडे रासायनिक परीक्षणाविना महिनाभर पोलीस ठाण्यात
राहुल अवसरे नागपूर
आरोपींचे रक्ताळलेले कपडे रासायनिक परीक्षणाविना तब्बल महिनाभर पोलीस ठाण्याच्या मालखान्यात पडून राहिल्याने बळावलेल्या संशयाचा आरोपींना लाभ मिळून सर्व आरोपी एका खून प्रकरणातून निर्दोष सुटले. हा ठाणेदाराचा निष्काळजीपणा होता, अनवधान की जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते, अशी शंका व्यक्त होत आहे. तपास यंत्रणेवर कुणाचे नियंत्रण नाही काय, असेच घडत राहिल्यास गुन्हे पीडितांना कसा न्याय मिळेल, ही अक्षम्य चूक करणाऱ्या दोषींविरुद्ध कारवाई होणार काय, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
३ जून २०१३ रोजी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडी उड्डाण पुलाच्या नजीक एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृताच्या गळ्यावर कापल्याच्या जखमा होत्या. पोलीस उपनिरीक्षक सुशील बोबडे यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलिसांना मृताची ओळख पटली होती. ज्ञानेश्वर गणपतराव सोळंके, असे मृताचे नाव होते. तो गुलमोहरनगर भरतवाडा येथील रहिवासी होती. पोलिसांनी विजय नंदलाल रहांगडाले (२९) हल्ली मुक्काम संघर्षनगर आणि श्रीकांत मारोतराव धोटे (२९) रा. देशपांडे ले-आऊट यांना अटक केली होती.
पोलिसांना तपासात असे आढळून आले होते की, मृत ज्ञानेश्वर याने आरोपी विजयला एक हजार रुपये उसणे दिले होते. दोन दिवसानंतर दोन्ही आरोपी आणि मृत ज्ञानेश्वर हे देशीदारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिल्यानंतर ज्ञानेश्वरने विजयला आपले पैसे मागितले असता त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही आरोपी मृताच्या स्कूटीने देशपांडे ले-आऊट येथे गेले होते.
विजयने आपल्या सासऱ्याच्या घरून चाकू घेतला होता. श्रीकांतनेही आपल्या घरून चाकू घेतला होता. दोन्ही आरोपी आणि मृत ज्ञानेश्वर हे स्कूटीने बिडगाव येथे गेले होते. या ठिकाणी तिघांनी दारू प्याली होती. त्यानंतर ते खेडी गावाकडे गेले होते. रस्त्यात पुन्हा त्यांचे भांडण झाले होते. परिणामी श्रीकांत याने ज्ञानेश्वरला पकडून ठेवून विजयने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला होता. मृतदेह घटनास्थळी टाकून दोन्ही आरोपी स्कूटी घेऊन पळून गेले होते. विजयने ही स्कूटी विनोद पराते याला विकून टाकली होती. आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे आणि चाकू जप्त करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी तपास करून न्यायालयात दोन्ही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. खुनाचा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयात चालून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींना संशयाचा लाभ देऊन त्यांची निर्दोष सुटका केली.
रक्तगट जुळला पण
न्यायालयाने आपल्या आदेशात पोलिसांच्या तपासातील या गंभीर चुकीचा उल्लेख केला आहे. मृताचे आणि दोन्ही आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे, रक्ताचे डाग असलेला चाकू तब्बल महिनाभर पोलीस मालखान्यात पडून राहिल्यानंतर हा मुद्देमाल रासायनिक परीक्षणासाठी पाठविण्यात आला होता. या मागील कोणतेही ठोस कारण तपास अधिकाऱ्याने नमूद केले नव्हते. परीक्षणात मृताचा रक्त गट ओ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचा गटही ओ पॉझिटिव्ह आला होता. परंतु तब्बल महिनाभरानंतर या कपड्यांचे परीक्षण झाल्याने ही बाब संशय घेणारी ठरली. या शिवाय आरोपी हे मृताला मारताना कुणीही पाहिले नव्हते. तसा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. सरकार पक्षाने हजर केलेले साक्षीदार अवैध दारू विक्रेत्यांपैकी होते. त्यामुळे या साक्षीदारांनी सरकार पक्षाला कोणतीही मदत केली नाही. या सर्व बाबींचा बचाव पक्षाला लाभ मिळाला.