आम्ही कसा देणार पेपर?

By Admin | Updated: May 25, 2015 03:00 IST2015-05-25T03:00:35+5:302015-05-25T03:00:35+5:30

संपूर्ण ‘सेमिस्टर’ ज्या विषयाचा जीव तोडून अभ्यास केला नेमक्या त्याच पेपरच्या वेळी एकाग्रताच राहू शकली नाही तर, ...

How do we give paper? | आम्ही कसा देणार पेपर?

आम्ही कसा देणार पेपर?

नागपूर : संपूर्ण ‘सेमिस्टर’ ज्या विषयाचा जीव तोडून अभ्यास केला नेमक्या त्याच पेपरच्या वेळी एकाग्रताच राहू शकली नाही तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अनेक परीक्षा केंद्रांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अव्यवस्था आहे. राज्याच्या मंत्र्यांना ‘कूलर’ पुरविणाऱ्या विद्यापीठाला अनेक परीक्षा केंद्रांवर साधी पंख्याची सुविधादेखील देणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठ कसले परीक्षा शुल्क घेते व आम्ही नेमका पेपर कसा द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. एप्रिल महिन्यात फारशी अडचण जाणवली नाही. मात्र गेल्या आठवड्यापासून तापमान प्रचंड वाढले आहे. अनेक परीक्षा केंद्रांवर कूलर तर सोडाच, परंतु पंखेदेखील नाहीत. त्यामुळे अक्षरश: घामाच्या धारा लागल्या असताना विद्यार्थ्यांना उकाड्यात पेपर लिहावा लागत आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. विद्यापीठाचे अनेक परीक्षाकेंद्र हे लग्न सभागृहांच्या जवळ आहेत. त्यामुळे तेथे वाजणारे ‘डीजे’ व बँडबाजांमुळे विद्यार्थ्यांना गोंगाटात पेपर लिहावा लागत आहे. अनेक परीक्षा केंद्र ‘सायलेन्स झोन’मध्ये येत असतानादेखील ‘डीजे’ वाजविण्यात येतात व परीक्षा केंद्रप्रमुखांकडून याची पोलिसांत तक्रार करण्यात येत नाही. शिवाय पिण्याचे थंड पाणीदेखील फारच कमी केंद्रांवर देण्यात येते. जे पाणी मिळते ते कोमट असते, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. परीक्षा केंद्रांवर निरीक्षकांकडूनदेखील चांगली वागणूक देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना अर्धवट सूचना देण्यात येतात व विद्यार्थ्याने असुविधेबाबत विचारणा केली तर उर्मट भाषेत उत्तर देण्यात येते. (प्रतिनिधी)

Web Title: How do we give paper?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.