नागपूर विद्यापीठ : अनेक महाविद्यालये, विभागात पायाभूत सुविधाच नाहीतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला ६०० हून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना दररोज परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा असते महाविद्यालयांत पोहोचण्याची, लढा असतो वर्गखोल्यांत प्रवेश करण्याचा अन् संघर्ष असतो स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देण्याचा. संलग्नित महाविद्यालयेच नव्हे तर विद्यापीठाच्या विभागांमध्ये अपंग विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. शिक्षण मनुष्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविते. परंतु अगोदरच अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना सुविधांचे पाठबळच नसल्याने त्यांची संधी तर हिरावून घेतल्या जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अपंग विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरक्षण, शुल्क सवलती, शिष्यवृत्ती अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेशदेखील घेतात. परंतु महाविद्यालयांत गेल्यावर मात्र त्यांना पायाभूत सुविधाच नसल्याचे लक्षात येते. पुण्यातील सीए करणारी आकांक्षा काळे नावाच्या अपंग विद्यार्थिनीला महाविद्यालयात जाण्याची काही सुविधाच नव्हती. त्यामुळे ती गेली दोन वर्षे परीक्षेलाच बसू शकली नाही. परंतु या मुलीने हार न मानता उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. आता न्यायालयाने सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना अपंगासाठी प्राथमिक सुविधा पुरवण्याचे आदेश दिलेत. या निमित्ताने ‘लोकमत’ने शहरातील निरनिराळ्या महाविद्यालयांची पाहणी केली असता अपंगांना वर्गखोल्यांत जाता येईल याची व्यवस्था अ़नेक ठिकाणी नसल्याचे दिसून आले. अपंग विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत बरीचशी महाविद्यालये अक्षम ठरली आहेत. नागपूर विद्यापीठातील काही मोजक्या महाविद्यालयांत अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु काही अपवाद सोडले तर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या व्हीलचेअरसाठी रँप, वरच्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी लिफ्ट, व्हीलचेअरवरून वापरता येण्याजोगे स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते. १९९५ पासून अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम अस्तित्वात असून,वारंवार सूचना, परिपत्रके काढूनही अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधाच निर्माण केलेल्या नाहीत व विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)विद्यापीठ विभागांत निराशाजनक चित्रकेवळ संलग्नित महाविद्यालयांतच नव्हे तर अगदी विद्यापीठाच्या विभागांतदेखील निराशाजनक चित्र आहे. अनेक विभागांमध्ये ‘रॅम्प’च उपलब्ध नाहीत. शिवाय वर्गदेखील तळमजल्यावर न घेता वरच्या मजल्यावर घेण्यात येतात. काही विभागांत तर तळमजल्यावर वर्गखोल्याच नाहीत. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत की नाही, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.पाहणीदरम्यान आढळलेल्या बाबीअनेक नामांकित महाविद्यालयांत ‘रॅम्प’च उपलब्ध नाहीतकाही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘रॅम्प’ योग्य नाहीत. ये-जा करताना विद्यार्थ्यांना त्रास होतो. काही ठिकाणी ‘रॅम्प’चा चढाव जास्त असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी.विद्यापीठाच्या विभागांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावरच वर्ग घेण्याची सोय नाही.अपंगांसाठी सोयीस्कर स्वच्छतागृहांचा अभाव
अपंग विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांत जायचे तरी कसे?
By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST