कशी नशिबानं थट्टा आज मांडली?
By Admin | Updated: May 19, 2016 02:33 IST2016-05-19T02:33:11+5:302016-05-19T02:33:11+5:30
मुलीचे लग्न तोंडावर आले. पण जवळ दमडी नाही. दुष्काळामुळे हाताला काम नाही. डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या हरिभाऊला सुचेनासे झाले.

कशी नशिबानं थट्टा आज मांडली?
दुष्काळाने लावले भिकेच्या दारी :
उस्मानाबादच्या हरिभाऊची व्यथा
मंगेश व्यवहारे नागपूर
मुलीचे लग्न तोंडावर आले. पण जवळ दमडी नाही. दुष्काळामुळे हाताला काम नाही. डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या हरिभाऊला सुचेनासे झाले. मात्र मरणाने कुटुंबाचा प्रश्न सुटणार नाही, हे त्याला ठाऊक आहे. गरीब असूनही आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या हरिभाऊवर भीक मागण्याची वेळ आली आहे. मुलीच्या लग्नाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी उस्मानाबादहून आलेला हा माणूस हातात तुणतुणं घेऊन नागपूरच्या रस्त्यावर नशिबाची अवहेलना झेलतो आहे.
मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाने अनेकांचे जगणेच विस्कळीत केले आहे. गावात पाणी नाही, पाण्यामुळे शेतीचे काम नाही. या दुष्काळाने असंख्य लोकांना अक्षरश: देशोधडीला लावले आहे. हरिभाऊही त्यातीलच एक. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोधी गावचे हरिभाऊ बाबुराव लोहार. लोखंडाला गरम करून त्यावर हातोडा मारून त्याला आकार देणारे हरिभाऊ आज दुष्काळाच्या हातोड्याने पुरता कोलमडला आहे. त्यांच्या शालन नावाच्या मुलीचे ३ मार्च रोजी लग्न होते. परंतु दुष्काळ असा पडला की लग्नासाठी पैसाच गोळा झाला नाही. तीन महिने पुढे लग्न ढकलल्याने पैशाच्या जुळवाजुळवीची चिंता त्यांना सतावू लागली. त्याच्या गावात इतरांचीही परिस्थिती त्याच्यासारखीच. मदत मागणार तरी कुणाला. त्यामुळे भीक मागून पै-पै गोळा करता यावी, नागपूरचे असलेल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहचावी, या आशेने हरिभाऊ नागपूरला पोहचले. गेल्या चार ते पाच दिवसापासून हरिभाऊ पाठीशी गाठोडे बांधून, तुणतुणं वाजवित येणाऱ्या-जाणाऱ्यांपुढे हात पसरतो आहे. शहर माहीत नाही, राहण्याची जागा नाही, कुणीही शहरात ओळखीचे नाही, तळपत्या उन्हात अनवाणी फिरतो आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता इतकी आहे की, रोजगाराच्या शोधात गावातील युवा पिढी दुसऱ्या राज्यात व शहराकडे स्थलांतरीत झाली आहे. गावात वृद्ध मंडळीच आहे. हरिभाऊचा व्यवसाय लोहाराचा आहे. दुष्काळामुळे शेतीची कामेच बंद असल्याने कामठप्प आहे. वयाच्या ७० व्या वर्षी जगण्याची आशा व मुलीच्या लग्नाचे कर्तव्य पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रयत्नाची पराकाष्ठा तो करीत आहे.
मोठ्या आशेने नागपुरात आलोय
मुख्यमंत्र्यांच्या शहरात मोठ्या आशेने आलो आहे. हे शहर मला निराश करणार नाही. मला मुख्यमंत्र्यांच्या पत्ता द्या, मी त्यांच्याकडे जाऊन मुलीच्या लग्नासाठी हात पसरेन. डोळ्याच्या कडा ओलावलेल्या हरिभाऊने आपली व्यथा बोलून दाखविली. - हरिभाऊ बाबूराव लोहार