लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सागवान वृक्षांच्या अवैध वृक्षतोडीबाबत भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर त्यांनी ती पुरविली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीने जन माहिती अधिकाऱ्यांकडे अपील केली. त्यांनीदेखील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी व जन माहिती अधिकारी ही एकच व्यक्ती असून, ते अवैध वृक्षतोडीवर पांघरूण घालण्यासाठी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे भंडारा जिल्ह्याच्या वनविभागात माहिती अधिकाराची क्रूर थट्टाही होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
सागर बारसागडे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी व जन माहिती अधिकारी अशा दोन पदांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. साकोली तालुक्याच्या नवीन नागझिरातील उमरझरी बीट एक आणि खांबा जांभळी बीटमध्ये झालेल्या फायरलाईनच्या कामाचे व्हाऊचर तसेच खांबा जांभळी बीटमध्ये झालेल्या अवैध वृक्षतोडीच्या चौकशीचा अहवाल गोविंद हटवार यांनी माहिती अधिकारात मागविला. परंतु, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे यांनी त्यांना माहिती पुरविली नाही. त्यानंतर हटवार यांनी जन माहिती अधिकारी असलेल्या सागर बारसागडे यांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत अपील केले. जन माहिती अधिकारी सागर बारसागडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे यांना म्हणजे स्वतःलाच पत्र देऊन माहिती उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले. दोन पदांवर असलेली एकच व्यक्ती एका पदावरून दुसऱ्याला माहिती उपलब्ध करून द्यावी, असे सांगते; पण माहिती उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करते, अशाप्रकारे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात माहिती अधिकाराचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
असा झाला गोलमाल
साकोली तालुक्याच्या नवीन नागझिरातील उमरझरी बीट एक आणि खांबा जांभळी बीटमध्ये झालेल्या फायरलाईनच्या कामाचे व्हाऊचर तसेच खांबा जांभळी बीटमध्ये सागवान वृक्षांची अवैध वृक्षतोड झाली. या अवैध वृक्षतोडीची तक्रार हटवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे यांच्याकडे केली; परंतु त्यांनी चौकशी करून त्यात काहीच आढळले नाही, असे तक्रारकर्त्याला सांगितले. त्यानंतर हटवार यांनी अवैध वृक्षतोडीचे फोटो काढून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांना पाठविले. त्यांनी सहायक वनसंरक्षक मनीषा चव्हाण यांना अवैध वृक्षतोडीच्या चौकशीचे आदेश दिले. चव्हाण यांनी चौकशीचा अहवाल कोडापे यांना सादर केला; परंतु त्या अहवालात काय आहे, वृक्षतोडीबाबत कोण दोषी आहे? याची माहिती मात्र वनविभागाचे अधिकारी लपवीत असून, माहितीच्या अधिकाराला देखील केराची टोपली दाखवित आहेत.
Web Summary : In Bhandara, a forest officer denied information requested under RTI, also serving as the Public Information Officer. This individual is allegedly concealing illegal logging, undermining the Right to Information act within the forest department.
Web Summary : भंडारा में, एक वन अधिकारी ने आरटीआई के तहत मांगी गई जानकारी देने से इनकार कर दिया, जो जन सूचना अधिकारी भी हैं। आरोप है कि यह व्यक्ति अवैध लॉगिंग को छुपा रहा है, जिससे वन विभाग में सूचना का अधिकार कमजोर हो रहा है।