हाऊसफुल्ल खरेदी
By Admin | Updated: November 9, 2015 05:52 IST2015-11-09T05:52:29+5:302015-11-09T05:52:29+5:30
घराघरात मांगल्य, ऐश्वर्य, आरोग्य आणि सुखाची शिंपण करणारी दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे या

हाऊसफुल्ल खरेदी
नागपूर : घराघरात मांगल्य, ऐश्वर्य, आरोग्य आणि सुखाची शिंपण करणारी दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे या सणासाठी लागणारे फराळाचे साहित्य, कपड्यांबरोबरच फटाक्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. रविवारी बाजार गर्दीने खचाखच भरले होते.
धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस ९ नोव्हेंबरला आहे. या दिवशी लोक सोने खरेदी करतात. त्या दिवशी सोने घडवून मिळावे यासाठी लोकांनी आधीच आॅर्डर देऊन ठेवली आहे. सध्या सोन्याचे भाव आटोक्यात आहेत. रविवारीही लोकांनी सराफा दुकानात एकच गर्दी केली होती.
धनत्रयोदशीचा मुहूर्त खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्या मुहूर्तावर वस्तू घरात यावी, यासाठी लोकांनी आठवडाभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये बुकिंगसाठी गर्दी केली. घराच्या रंगरंगोटीसाठी हार्डवेअरच्या दुकानातही चांगली गर्दी आहे. ब्रॅण्डेड कंपनांच्या रंगांना चांगलीच मागणी आहे. बाजारात रेडिमेड कपड्यांच्या दुकानात सध्या पाय ठेवायला जागा नाही. रांगोळ्या, आकाशदिवे, मातीचे दिवे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गाड्या खरेदी आदींसाठी नागपूरकरांनी गर्दी केली आहे. (प्रतिनिधी)
सुकामेव्याची विक्री वाढली
दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल वाढला असून कलात्मक ड्रायफ्रूट गिफ्ट बॉक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महावीर मेवावाला फर्मने विविध आकार आणि आकर्षक डिझाईनमध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूटचे बॉक्स आणले आहेत. किफायत दरामुळे भेटस्वरुपात देता येते. आकर्षक पॅकिंगचे गिफ्ट बॉक्स देण्याची पद्धत गेल्या ७ ते ८ वर्षांत वाढली आहे. मिठाई जास्त दिवस फे्रश राहत नाही, हे त्याचे मुख्य कारण आहे. ड्रायफ्रूट ८ ते ९ महिने फ्रेश राहतात. कार्पोरेट कंपन्यांसह अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे बॉक्सेस एकमेकांना भेट देतात. गेल्या काही वर्षात काजू कतलीची मागणी वाढली आहे.
रंगीबेरंगी आकाशदिवे
बाजारात विविध रंगीबेरंगी आकाशदिवे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आहेत. मेड इन चायना आकाशदिव्यांची रेलचेलही मोठ्या प्रमाणावर असून कागदी आणि प्लॅस्टिक प्रकारात उपलब्ध विविध आकारामध्ये आहेत. लाल, पिवळ्या व संमिश्र रंगामध्ये असल्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करीत आहेत. ग्राहकांची खरेदी वाढली आहे.
रेडिमेड फराळांना मागणी
दिवाळी म्हटली की, घरोघरी आकर्षक आकाशदिवे, पणत्या, सुगंधी तेल, उटणे, अत्तरांचा दरवळ तसेच झणझणीत चिवडा, चकली, करंज्या, लाडू यासह विविध फराळांचा घमघमाट असतो. दिवाळी सणासाठी लागणारा फराळ तयार करण्याचे साहित्य खरेदीसाठी महिलावर्गाची बाजारपेठेत गर्दी आहे. पाकिटावरील पॅकिंग तारीख, कालमर्यादा, वजन व किमतीची चौकशी करूनच ग्राहकांनी खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. रेडिमेड फराळांनाही मोठी मागणी आहे. त्याचबरोबर बंगाली, दाक्षिणात्य व उत्तर भारतीय मिठार्इंची रेलचेल वाढली आहे.