घरातील नोटा बँकेत

By Admin | Updated: November 11, 2016 02:35 IST2016-11-11T02:35:52+5:302016-11-11T02:35:52+5:30

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे.

House Notes in Bank | घरातील नोटा बँकेत

घरातील नोटा बँकेत

१०० कोटींवर रोख जमा : अनेकांनी केले फिक्स डिपॉझिट
नागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे. गुरुवारी बँक सुरू होताच नागरिकांनी बँकेत गर्दी केली. आजवर घरात ठेवलेले पैसे राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँकेसह पतसंस्थांमधील बचत आणि चालू खात्यात जमा केले. अनेकांनी रक्कम फिक्स डिपॉझिट केली. नागरिकांच्या घरात असलेले सुमारे १०० कोटी रुपये आज पहिल्याच दिवशी बँकेत जमा झाले. सर्वाधिक ठेवी सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये जमा झाल्याची माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना दिली.

बँका, पंतसंस्थांमध्ये रांगा
जोखीम नको म्हणून लोकांनी घरी जमा असलेली रक्कम खात्यात जमा करून सुरक्षित केली. तज्ज्ञांनी सांगितले की, नागपुरात २७ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका आणि सहकारी बँकांच्या जवळपास २५० पेक्षा जास्त आणि पतसंस्थांच्या २५० पेक्षा जास्त शाखा आहेत. या सर्व बँका आणि पतसंस्थांमध्ये ग्राहकांनी रक्कम भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. बंद झालेल्या नोटा बँकेत भरण्यासाठी सर्वजण उत्सुक दिसले. गुरुवारी सर्व शाखांमध्ये भरणा केलेल्या रकमेची आकडेवारी १०० कोटींपेक्षा जास्त आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही पतसंस्थांनी फिक्स डिपॉझिट करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याची जाहिरातही केली. अपेक्षेनुसार त्यांना प्रतिसादही मिळाला. पुढील तीन दिवसात बँकेत जमा होणाऱ्या पैशाचा हिशेब ३०० कोटींच्या घरात जाईल, असे अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

पोलीस बंदोबस्त, नागरिकांमध्ये वाद
शहरातील काही बँकांसमोर रांगांमध्ये उभे असलेल्या नागरिकांमध्ये वाद झाले. असे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जेथे जास्त गर्दी दिसत होती, तेथे पोलिसांचे गस्तीपथक थांबत होते. शारदा चौक येथील ‘एचडीएफसी’ बँक, गांधीसागर तलावासमोरील ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’ तसेच लक्ष्मीनगर परिसरातील ‘आयडीबीआय’ बँक यांच्याजवळ पोलीस तैनात होते. नागरिकांना संयम बाळगण्याच्या सूचना पोलिसांकडूनदेखील देण्यात येत होत्या.

बँकांसमोर वाहतुकीचा खोळंबा
दरम्यान, सकाळपासूनच अनेक बँकांमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात ‘पार्किंग’ करण्यात आले होते. महाल, इतवारी, सदर, सीताबर्डी इत्यादी ठिकाणी यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.

पैसे संपले गोंधळ उडाला
सिव्हील लाईन्स परिसरातील व्हीसीएसमोर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मिड कॉर्पोरेट शाखेत पैसे भरण्यासाठी आणि चलन बदलून घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होती. दोन काऊंटर उघडण्यात आले होते. सकाळपासून सुरळीतच व्यवहार सुरू होता. दुपारी ४.३० वाजता अचानक पैसे संपले आणि एकच गोंधळ उडाला. रांगेत उभे असलेले नागरिक संतप्त झाले. बँकेतील अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर सर्व शांत झाले. नंतर बँकेचे गेट बंद करण्यात आले. जी मंडळी आत होती, त्यांना पैसे जमा करता आले आणि काढला आले. त्यामुळे ४३० नंतर अनेकांना बंद गेट असल्याने परत जावे लागले.

Web Title: House Notes in Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.