हॉटस्पॉट ठरलेल्या वस्त्यांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:52+5:302020-12-27T04:06:52+5:30
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. विशेष म्हणजे, ...

हॉटस्पॉट ठरलेल्या वस्त्यांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेल्या महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मोमिनपुरा, तकिया, भानखेडा, टिमकी, हंसापुरी, कसाबपुरा, नाईक तलाव, बांगलादेश व सतरंजीपुरा आदी वसाहती हॉटस्पॉट ठरल्या होत्या.
शहरात पहिल्या रुग्णाची नोंद मार्च महिन्यात झाली. हा रुग्ण लक्ष्मीनगर झोनअंतर्गत बजाजनगर वसाहतीतील होता. एप्रिल महिन्याला सुरुवात होताच मनपाच्या झोन क्र. ७ सतरंजीपुराअंतर्गत वसाहतीत रुग्ण वाढायला लागले. येथील रुग्ण कमी होत नाही तोच मनपाच्या झोन क्र. ६ गांधीबागअंतर्गत वसाहती हॉटस्पॉट होऊ लागल्या. परंतु नंतर सर्वच झोनमधून रुग्णांची नोंद होऊ लागली. यात म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगरअंतर्गत वसाहतीमधीलही रुग्ण होते. विशेष म्हणजे, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूच्या संख्येत कमालीची वाढ झाली. भयावह आकडेवारीने चिंतेचे वातावरण गडद झाले होते. परंतु ऑक्टोबरपासून कोराेनाचा वेग मंदावला. सध्या नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३५० ते ४५० दरम्यान रोज आढळून येत असली तरी विशिष्ट वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण समोर येण्याची संख्या कमी झाली आहे.
-नाईक तलाव-बांगलादेशमधून १५० वर रुग्ण
कोरोनाच्या सर्वाधिक प्रादुर्भावाचा काळात सतरंजीपुरा झोनच्या इतरही वसाहतींसह नाईक-तलाव बांगलादेशमधून एकाच दिवशी १५०वर रुग्ण आढळून आले होते. तर गांधीबाग झोनच्या इतरही वसाहतींसह ८० वर रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आता या दोन्ही झोनमध्ये रोज ५ ते ७ रुग्ण नोंदविले जात आहेत. यातही रोजच रुग्ण दिसून येतील असे राहिले नाही.
-म्हाळगीनगर झोनमध्येही आढळून आले होते सर्वाधिक रुग्ण
मनपाच्या म्हाळगीनगर झोनमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. विशेषत: ३१ ऑगस्ट रोजी १५६, २ सप्टेंबर रोजी ८८, ३ सप्टेंबर रोजी १३२ तर ५ सप्टेंबर रोजी १८४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सप्टेंबर महिन्यातही या झोनमध्ये इतर झोनच्या तुलनेत अधिक रुग्ण दिसून आले होते. परंतु सध्या या झोनमध्येही रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
-या वसाहती ठरल्या होत्या हॉटस्पॉट
मोमिनपुरा, तकिया, भानखेडा, टिमकी, हंसापुरी, कसाबपुरा, नाईक तलाव, बांगलादेश, सतरंजीपुरा, म्हाळगीनगर.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचे ट्रेसिंग, त्यांचे संस्थात्मक विलगीकरण, कोरोनाचे निदान, रुग्णांना उपचाराखाली आणणे आदींमुळे हॉटस्पॉट ठरलेल्या वसाहतींमधील कोरोनाची साखळी तोडण्यास मदत झाली. सध्या सरासरी ५ ते ७ कोरानाचे रुग्ण आढळून येतात. परंतु रोजच हे रुग्ण आढळून येतील असे नाही.
-डॉ. मीना माने
आरोग्य अधिकारी, सतरंजीपुरा झोन मनपा