ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
By Admin | Updated: June 5, 2017 02:11 IST2017-06-05T02:11:56+5:302017-06-05T02:11:56+5:30
मध्य भारताला उपयोगी पडेल असे दिव्यांगासाठीचे साहित्य निर्मिती केंद्र्र नागपुरात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी येथे केली.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
फडणवीस-गडकरींच्या मागणीला मान्यता : ज्येष्ठांना साहित्य वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारताला उपयोगी पडेल असे दिव्यांगासाठीचे साहित्य निर्मिती केंद्र्र नागपुरात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी येथे केली. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शैक्षणिक केंद्र झालेल्या नागपूरमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याची मागणी केली होती. त्याला मान्यता देत असल्याचे जाहीर केले.
नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमता मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत दीड हजार ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, अनिल सोले आदी उपस्थित होते.
नागपूर येथे दिव्यांगासाठी साहित्य निर्मिती केंद्र्र व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमता मंत्री थावरचंद गेहलोत यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गरीब जेव्हा म्हातारा होतो तेव्हा आवश्यकता असून आपल्या गरजा कुटुंबापुढे मांडू शकत नाही. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे स्वत:च्या गरजा, शारीरिक व्याधी व आवश्यक असणाऱ्या वृध्दत्वातील छोट्या पूरक साहित्याची गरज सुध्दा भागवू शकत नाही. त्यामुळे केंद्र किंवा राज्य शासनाने एक बृहत् कुटुंब म्हणून ही जबाबदारी घेण्यासाठी पुढे येण्याचे ठरविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरातील वृध्दाला त्याच्या म्हातारपणात आवश्यक साहित्य मिळावे यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत नागपूरमध्ये साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही संबोधित केले.
इलेक्ट्रीक बसचा वापर दिव्यांगांसाठी-गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आजपर्यंत सात हजार कोटीचे साहित्य वाटप केल्याबद्दल गेहलोत यांचे अभिनंदन केले. दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय देताना जर्मन व लंडन येथील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला मिळालेल्या इलेक्ट्रीक बसचा वापर दिव्यांगासाठी मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच महानगरपालिकेने महिलांच्या स्तन कॅन्सरसाठी मोहीम राबविण्याची सूचना केली.
दीड हजार ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप
या कार्यक्रमामध्ये दीड हजार ज्येष्ठ नागरिकांना सायकल वॉकर, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, वॉकिंग स्टीक आदी साहित्याचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. दिव्यांगासाठी आजपर्यंत पाच हजार कॅम्प घेऊन देशभर आपला विभाग कार्यरत असल्याचे समाधान केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले.