रुग्णालयांनी वाढविला बीपी
By Admin | Updated: July 22, 2014 00:56 IST2014-07-22T00:56:16+5:302014-07-22T00:56:16+5:30
धंतोली शहरातील उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानांचा परिसर म्हणून ओळखले जातो. एकेकाळी येथे विस्तीर्ण जागेत पसरलेले बंगले असायचे. परंतु आज या बंगल्याच्या जागी टोलेजंग इमारती झाल्या आहेत.

रुग्णालयांनी वाढविला बीपी
चेन स्नॅचर्सचा धसका : चोऱ्या वाढल्या
आनंद डेकाटे - नागपूर
धंतोली शहरातील उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानांचा परिसर म्हणून ओळखले जातो. एकेकाळी येथे विस्तीर्ण जागेत पसरलेले बंगले असायचे. परंतु आज या बंगल्याच्या जागी टोलेजंग इमारती झाल्या आहेत. या इमारतींमध्ये बहुतांश खासगी रुग्णालये थाटण्यात आली आहेत. रुग्णालयांचा परिसर म्हणूनही धंतोलीला ओळखले जाते. या रुग्णालयांमुळे कायदेशीर प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्याने पोलिसांच्या दृष्टीने नवीनच समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयांनी धंतोली पोलिसांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढविले आहे.
नागपूर शहर हे मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी दूरवरून लोक येतात. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश असतो. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालये ही धंतोली परिसरात एकवटली आहेत. त्यामुळे बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे बस्तान धंतोली परिसरातच असते. अपघातात जखमी झालेले, जळालेले रुग्ण येथे उपचारासाठी आणले जातात. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास धंतोली पोलिसांना सूचना केली जाते. तक्रार नोंदविल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक आपापल्या राज्यात, गावी निघून जातात. परंतु संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्या साक्षीपुराव्यासाठी किंवा तपासाच्या दृष्टीने धंतोली पोलिसांना मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा जिल्ह्यातील दूरवरच्या गावांमध्ये चकरा माराव्या लागतात. धंतोली पोलिसांचा बहुतांश वेळ यातच जात असतो. अनेकदा तर साक्षीदार त्याच्या मूळ गावातच राहत नाही. अशावेळी त्यांना शोधून काढणे अवघड ठरते.
मनुष्यबळाची गरज
धंतोली पोलीस ठाण्यामध्ये एकूण १०५ पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत. यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, चार एपीआय, चार पीएसआय, तीन एएसआय, २१ हवालदार, १८ एनपीसी, ३३ पीसी आहेत. एकूण १२३ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ही संख्या कमी आहे. पोलीस ठाण्याचा वाढलेला व्याप लक्षात घेता, किमान रिक्त जागा तरी भरण्याची गरज आहे.
२८८ हॉस्पिटल्स
धंतोली परिसरात जवळपास २८८ रुग्णालये आहेत. यामध्ये कर्करोगापासून तर पोटाच्या विकारापर्यंत आणि बालरोग, स्त्रीरोगापासून तर नेत्ररोगापर्यंत सर्वच प्रकारची रुग्णालये आहेत. टोलेजंग इमारतींमध्ये असलेल्या या रुग्णालयांपैकी बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची जागा नाही. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्यांना रस्त्यावरच वाहन पार्क करावे लागते. रुग्णालयांमुळे येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढल्याने धंतोलीतील रस्ते आता लहान पडू लागले आहेत. वाहनांमुळे आणखीनच त्रास होतो. यातच वाहन चोरीच्या घटनाही वाढलेल्या आहेत.
७.१० चौरस किलोमीटरचा परिसर
धंतोली पोलीस ठाणेचा संपूर्ण परिसर ७.१० चौरस किलोमीटर येतो. यामध्ये आनंद टॉकीज पूल ते नरेंद्रनगर पूल, नरेंद्रनगर पूल ते आॅरेंजसिटी सर्कल, आॅरेंजसिटी ते बजाजनगर, बजाजनगर ते लोकमत चौक, लोकमत चौक ते मुंजे चौक, मुंजे चौक ते आनंद टॉकीज चौक असा हा परिसर आहे. कुंभारटोली आणि तकिया या दोन झोपडपट्ट्यासुद्धा धंतोली पोलीस ठाणे हद्दीत येतात.
दुचाकी चोर व चेन स्नॅचर्सचा हैदोस
खून, दरोडे, मारामारीसारखे गुन्हे या परिसरात कमी असले तरी मागील काही वर्षांमध्ये दुचाकी चोर आणि चेन स्नॅचर्सने चांगलाच हैदोस घातला आहे. त्यासोबत आर्थिक फसवणुकीचे गुन्हेसुद्धा प्रचंड होत असतात. बहुतांश उच्चभ्रू लोकांची ही वस्ती असून मध्य भागाचा परिसर असल्याने आपले काम फत्ते करून सहजपणे पळून जाता येत असल्याने चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. यातही लक्ष्मीनगर, नरेंद्रनगर आणि नीरी कॉलनी वसाहत हे परिसर चेन स्नॅचर्सचे टारगेट आहेत. यासोबतच चोरी, घरफोडीच्या घटनाही वाढलेल्या आहेत.
तुरुंगातील कैद्यांचाही भार
धंतोली पोलीस ठाणे हद्दीत नागपूर मध्यवर्ती कारागृह येत असल्याने कारागृहातील कैद्यांचा भारसुद्धा धंतोली पोलिसांनाच उचलावा लागतो. एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याच्याशी संबंधित कुठलेही प्रकरण असल्यास धंतोली पोलिसांना आपली भूमिका पार पाडावीच लागते. यासोबतच फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे गोडाऊन, अजनी रेल्वे स्थानक, नीरी ही राष्ट्रीय संशोधन संस्था, त्यातील कर्मचाऱ्यांची वसाहत हे महत्त्वाचे क्षेत्रही धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतच येतात.