रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला
By Admin | Updated: May 30, 2014 01:02 IST2014-05-30T01:02:37+5:302014-05-30T01:02:37+5:30
सायंकाळी मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन केंद्राच्या फ्रिजरमध्ये न ठेवता रूग्णालयाच्या कर्मचार्यांनी सामानाच्या खोलीमध्ये ठेवला. त्यामुळे रात्रभर उंदरांनी मृतदेह कुरतडला.

रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला
कर्मचार्यांचा हलगर्जीपणा : घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाईची मागणी
गडचिरोली : सायंकाळी मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन केंद्राच्या फ्रिजरमध्ये न ठेवता रूग्णालयाच्या कर्मचार्यांनी सामानाच्या खोलीमध्ये ठेवला. त्यामुळे रात्रभर उंदरांनी मृतदेह कुरतडला. रूग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविषयी नातेवाईकांनी तिव्र संताप व्यक्त केला असून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा येथील रंगूबाई पांडुरंग पेदापल्लीवार (६५) या महिलेला बुधवारी दुपारच्या सुमारास किटकाने चावा घेतल्याने तिला मूल येथे हलविण्यात आले. मात्र तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने मूल येथील डॉक्टरांनी तिला गडचिरोली येथील रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथे आणण्यात आले.
मात्र अवघ्या एका तासातच तिचा मृत्यू झाला. सदर मृतदेहाचा पंचनामा गुरूवारी सकाळी करायचा असल्याने रूग्णालय प्रशासनाने तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह रात्रभर रूग्णालय प्रशासनाच्या ताब्यात राहत असेल तर तो मृतदेह रूग्णालय परिसरात असलेल्या शवविच्छेदन केंद्रात ठेवणे आवश्यक होते. शवविच्छेदन केंद्रात सध्या स्थितीत चार फ्रिजर आहेत.
मात्र रूग्णालयात प्रशासनातील कर्मचार्यांनी रंगूबाईचा मृतदेह शवविच्छेदन केंद्रात न नेता तो रूग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या २५ क्रमांकाच्या खोलीमध्ये ठेवला.
रात्रभर खोलीतील उदरांनी रंगूबाईच्या मृतदेहाचे लचके तोडले. रंगूबाईचा चेहरा कुरतुडून विद्रूप केला. एवढेच नाही तर डोळ्याचा भागही कुरतडून ठेवला. एका हातावरचे मांस फस्त केले. चेहर्यावरचे मास उंदरांनी खाल्याने रंगूबाईला ओळखणेही कठीण झाले होते.
शवविच्छेदन केंद्राकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. रंगूबाईचा चेहरा पाहून नातेवाईकांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. काही नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्विचऑफ होता व ते चामोर्शी येथे दौर्यावर असल्याची माहिती रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली.
रूग्णालयातील जबाबदार लोकांनी जिल्हा शल्य चिकित्सक बैठकीत आहेत, असे सांगितले. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही. (नगर प्रतिनिधी)