आशातार्इंनी केले निराश
By Admin | Updated: January 23, 2015 02:45 IST2015-01-23T02:45:23+5:302015-01-23T02:45:23+5:30
आशातार्इंनी एके काळी उत्तमोत्तम आणि अजरामर गीते रसिकांच्या पुढ्यात टाकली. त्यांच्या हजारो गीतांवर तब्बल सहा दशके रसिकांचे भावविश्व तोलले आहे. पण आता त्यांचे वय झाले आहे.

आशातार्इंनी केले निराश
नागपूर : आशातार्इंनी एके काळी उत्तमोत्तम आणि अजरामर गीते रसिकांच्या पुढ्यात टाकली. त्यांच्या हजारो गीतांवर तब्बल सहा दशके रसिकांचे भावविश्व तोलले आहे. पण आता त्यांचे वय झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्या गातात हा कौतुकाचा आणि आदराचा विषय आहे. गेली सहा दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले हे सत्य असले तरी त्यांनी आता थांबायला हवे. कुठे थांबावे हे कळायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच आजच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित नागपूर महोत्सवात आज त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या वयामुळे अलीकडे आशातार्इंचे सूर लागत नाहीत, असे बोलले जाते. त्याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमात आला. त्या मनापासून सादर करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण त्यांचे सूर लागत नव्हते. ‘मलमली तारुण्य माझे..., शारद सुंदर चंदेरी राती..., का रे अबोला..’ ही गीते नजाकतीने सादर करणाऱ्या आशाताई याच का, असा प्रश्न रसिकांना पडला. आशाताई व्यावसायिक गायक म्हणून कार्यक्रमाच्या मानधनाबाबत तडजोड करीत नाहीत. नागपूर महानगरपालिकेने या कार्यक्रमासाठीही त्यांना घसघशीत मानधन दिले आहे. केवळ मराठी गाण्यांचा कार्यक्रम असेल तर वेगळे मानधन. हिंदी गीतांच्या कार्यक्रमासाठी जास्त मानधन आणि हिंदी व मराठी गीतांच्या कार्यक्रमासाठी दुप्पट मानधन असा आशातार्इंच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक कराराचा भाग आहे. त्यात त्या तडजोड करीत नाहीत. मानधनात तडजोड नसताना तेवढ्याच तयारीचे आणि ताकदीचे सादरीकरण मात्र त्या करीत नाहीत. नागपूरकरांनी आतापर्यंत आशातार्इंवर भरभरुन प्रेम केले. हा महोत्सव नागपूरकरांच्या अस्मितेचा आणि गौरवाचा आहे. त्यात असा कार्यक्रम सादर करणे म्हणजे नागपूरकरांचा अपमानच असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. व्यावसायिक पातळीवर कुठलीही तडजोड न करणाऱ्या कुठल्याही मोठ्या गायिकेला नागपूरकरांचा असा अपमान करण्याची मुभा नाही. व्यावसायिक गायक म्हणून कुठलाही गायक येत असेल तर त्याने गुणवत्ता आणि गायनाचा दर्जा राखायलाच हवा. कार्यक्रमात रवींद्र साठे यांनी ‘कुणाच्या
खांद्यावर कुणाचे ओझे..., सख्या रे घायाळ मी हरिणी..., धार वज्राची असू दे...’ आदी त्यांची गीते सादर केली. त्यांच्या गीतांनी रसिकांना आनंद मिळाला. याप्रसंगी त्यांनी दीदींनी गायिलेले ‘अवचिता परिमळु..., मी रात टाकली...’ ही गीते आशातार्इंनी सादर केली. पण त्यात मजा आली नाही. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि त्यांची पुण्याई लक्षात घेत आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवित प्रेक्षकांनी त्यांना सहन केले. (प्रतिनिधी)