आशा स्वयंसेविका मेडिकल किटपासून वंचित
By Admin | Updated: August 7, 2014 23:00 IST2014-08-07T20:38:57+5:302014-08-07T23:00:24+5:30
अकोला जिल्ह्यातील ११४५ आशा स्वयंसेविकांना अद्यापही मेडिकल किटचे वितरण करण्यात आलेले नाही.

आशा स्वयंसेविका मेडिकल किटपासून वंचित
सायखेड: आरोग्य सेवेशी संलग्न असलेल्या व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात ग्रामपंचायत स्तरावर सतत सेवा देणार्या अकोला जिल्ह्यातील ११४५ आशा स्वयंसेविकांना अद्यापही मेडिकल किटचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी, ग्रामपातळीवरील रुग्ण तातडीच्या औषधोपचारापासून वंचित आहेत. आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणे, सिकलसेल आजाराबाबत ग्रामीण नागरिकांना मार्गदर्शन करणे, बालकांना पोलिओसह विविध आजाराच्या लस देणे व त्यांची नोंद ठेवणे, कुष्ठरोग, क्षयरोगांच्या रुग्णांवर औषधोपचार करणे, या कामांसह आरोग्य यंत्रणेने ठरवून दिलेल्या जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. ग्रामीण भागात उद्भवणारे हिवताप, अतिसार, डायरिया, खोकला, ताप यासह जखमा आदीवर तातडीने तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मेडिकल किटचे वाटप करण्यात येते; परंतु, यावर्षी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना या किटचे वाटप अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात अनेक आजारांनी लोक आजारी पडत आहेत. त्यांना आशा स्वयंसेविकांकडे तातडीचे उपचार करण्यासाठी मेडिकल किट असल्याची माहिती मिळाल्यामुळे असे रुग्ण आशा स्वयंसेविकांकडे उपचाराच्या आशेने येत आहेत; परंतु आशांकडे उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली मेडिकल किटच उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी त्यांची निराशा होत आहे. या बाबीची दखल घेऊन आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविकांना त्वरित मेडिकल किटचे वाटप करावे, अशी मागणी केली जात आहे.