‘स्मार्ट’साठी आशेचा किरण
By Admin | Updated: January 30, 2016 03:12 IST2016-01-30T03:12:09+5:302016-01-30T03:12:09+5:30
‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर आता पुरवणी परीक्षेत पास होण्यासाठी नागपूर महापालिकेने धडपड सुरू केली आहे.

‘स्मार्ट’साठी आशेचा किरण
सुधारित प्रस्ताव पाठविणार : सहा महिन्यात गुड न्यूज
नागपूर : ‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर आता पुरवणी परीक्षेत पास होण्यासाठी नागपूर महापालिकेने धडपड सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट होण्याची नागपूरला आणखी एक संधी आहे. त्यासाठी जूनपर्यंत सुधारित प्रस्ताव पाठवावा लागणार असून आॅगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये निवडीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या चर्चेत याचे संकेत मिळाले असून सहा महिन्यात नागपूरकरांना गुड न्यूज ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.
नागपूरचा क्रमांक पहिल्या दहा शहरांमध्ये लागेल, अशी स्वप्ने उराशी बाळगून असलेल्यांना गुरुवारी जोरदार झटका बसला. गडकरी आणि फडणवीसांचे शहर वगळल्या गेले यावर विश्वास ठेवायला नागपूरकर तयार नाहीत. स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेली देशातील २० शहरे ही १२ राज्यातील आहेत. २३ राज्यातील एका शहराचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलेला नाही. एवढी एकच बाब नागपूरच्या अपयशावर फुंकर घालणारी आहे. प्राप्त माहितीनुसार आता प्राधान्याने संबंधित २३ राज्यातील शहरांची आपसात जलद स्पर्धा (ह्यफास्टट्रॅक कॉम्पिटिशन) घेतली जाईल. यासाठी या शहरांना १५ एप्रिलपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावे लागतील. यानंतर उरलेल्या ५४ शहरांना १५ जूनपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावे लागतील. या सुधारित प्रस्तावामध्ये नागपूरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पूर्वीच्या प्रस्तावात महापालिका कुठे कमी पडली, कोणत्या मुद्यांवर महापालिकेचे गुण कमी झाले याचा सखोल अभ्यास केला जाणार असून प्रत्येक मुद्दा सक्षम करून प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पॉन्डीचेरी, चंदीगड आणि नागपूर या शहरांकरिता करार करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या पाच ‘स्मार्ट सिटी’करिता युनायटेड स्टेट आणि फ्रान्स या देशांसोबत करारही करण्यात आले होते. मात्र, यापैकी एकाही शहराचा नंबर लागलेला नाही.
पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे फ्रान्ससोबत झालेल्या करारावर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा महापौर प्रवीण दटके यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
फेब्रुवारीत फ्रान्सचा दौरा
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहराचा फ्रान्ससोबत करार झाला आहे. या प्रकल्पासाठी फ्रान्स संपूर्ण तांत्रिक साहाय्य पुरविणार आहे. फ्रान्सने त्यांच्या देशातील स्मार्ट शहरे बघण्यासाठी महापालिकेला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी फेब्रुवारीमध्ये फ्रान्सचा दौरा करणार आहेत.