आशेच्या पणतीत आनंदाचे प्रकाशपर्व
By Admin | Updated: November 10, 2015 03:23 IST2015-11-10T03:23:50+5:302015-11-10T03:23:50+5:30
दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, नाविन्याचे स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, गोडधोडाची रेलचेल अन् आप्तांसोबत आनंदाचा संवाद!

आशेच्या पणतीत आनंदाचे प्रकाशपर्व
नागपूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, नाविन्याचे स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, गोडधोडाची रेलचेल अन् आप्तांसोबत आनंदाचा संवाद! परंतु काही लोकांच्या आयुष्यात दिवाळीतदेखील गरिबी अन् उपेक्षेचा अंधारच असतो. काळोखात चाचपडणाऱ्या या वंचितांच्या आयुष्यात प्रकाशरूपी आनंद उजळविण्याची जबाबदारी ही समाजातील सर्वच नागरिकांची आहे. हीच बाब लक्षात घेऊन अनेक नागपूरकर पुढे सरसावले आहेत आणि दिवाळीच्या या मंगलमय सणाला विधायक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे. एकीकडे सकाळच्या सुमारास शहरात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन होत असताना सामाजिक भावनेतून ‘दिवाळी संवाद’देखील घडताना दिसून येत आहे.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्यांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश यावा, यासाठी शहरातील नागरिकांसह अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अनाथालय, वृद्धाश्रम, महिला आश्रम, रुग्णालय येथील व्यक्तींसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून दीपोत्सवाचा आनंद शतगुणीत होत आहे.
घरापासून, कुटुंबापासून दुरावलेली मुले, वृद्ध व्यक्ती यांना भेटवस्तूंपेक्षा कोणाचा तरी सहवास जास्त हवाहवासा वाटतो. संवाद साधण्यासाठी त्यांना माणसांची ओढ असते. हे लक्षात घेऊन अनेक तरुणांनी दिवाळी संवाद साधाला. आपल्या सभोवताल असलेल्या या व्यक्ती खऱ्या अर्थाने ‘हे जग सुंदर आहे’ ही अनुभूती सर्वांपर्यंत पोहोचवीत आहेत. (प्रतिनिधी)