गुंडांचा हैदोस
By Admin | Updated: July 6, 2015 03:19 IST2015-07-06T03:19:12+5:302015-07-06T03:19:12+5:30
बिल्डरच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात उपराजधानीतील कुख्यात गुंडांनी शनिवारी दिवसाढवळ्या सोनेगाव परिसरात दरोडा घातला.

गुंडांचा हैदोस
अभियंत्याला मारहाण : कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जाचा प्रयत्न
नागपूर : बिल्डरच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात उपराजधानीतील कुख्यात गुंडांनी शनिवारी दिवसाढवळ्या सोनेगाव परिसरात दरोडा घातला. तलवार, खंजीरचा धाक दाखवून अभियंत्याला मारहाण केली आणि रोख ५० हजारांसह किंमती चीजवस्तू हिसकावून नेल्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
सोनेगावच्या भामटी परिसरात नटराज को-आॅप सोसायटीची जागा नरेश बरडे नामक बिल्डरने विकत घेतली आहे. कोट्यवधीच्या या जागेची बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्या एका गटाने त्या जागेवर आपली मालकी सांगितल्यामुळे बरडे आणि लोलगे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. संभाव्य धोका लक्षात घेता या जागेभोवती वॉल कंम्पाऊंडचे काम बिल्डरने सुरू केले.
शनिवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास कुख्यात सूरज लोलगे (प्रतापनगर), कार्तिक शर्मा (हावरापेठ), रोहित सिरसाठ (बोरगाव), पीयूष गौर (पार्वतीनगर), संदीप नाडे (रा. रहाटेनगर), अंकुश मिश्रा (रा. उथाननगर), ईवान राऊत (रा. पोलीस लाईन टाकळी), अजहर शेख (भूपेशनगर), दीपेंद्र नायक (बोरगाव), अब्दुल सरफराज (रा. भालदारपुरा), मंगल यादव आणि पापा यादव (एफसीआय गोदामाजवळ, अजनी) तसेच त्यांचे ४० ते ५० साथीदार या भूखंडावर पोहचले. त्यांच्याकडे तलवार, खंजीर, चाकू, रॉड आदी शस्त्रे होती.
त्यांनी आरडाओरड आणि अश्लील शिवीगाळ करीत तेथील कामगारांना पळवून लावले. या ठिकाणी बांधकामाचे निर्देश देणारे अभियंता राहुल शिवाजी धोटे (वय ३५) यांना उपरोक्त गुंडांनी शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याजवळचे रोख ५० हजार तसेच लॅपटॉप, चार्जर, रेनकोट, डोंगल हिसकावून घेतले.
सुमारे अर्धा तास त्यांचा हैदोस सुरू होता. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. फोन करून कुणीतरी माहिती कळवल्यामुळे सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला.
ते पाहून गुंडांनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून काहींना सोनेगाव तर काहींना प्रतापनगर परिसरात पकडले.(प्रतिनिधी)
ठाण्याच्या परिसरातून पळाले आरोपी
या गुंडांना सोनेगाव ठाण्यात आणण्यात आले. पोलीस घाईगडबडीत असल्याचे पाहून यातील सूरज लोलगेसह दोन आरोपी पळून गेले. तर, मंगल आणि पापा यादवसह काही आरोपी अजनी परिसरात असूनही पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे टाळल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सूत्रधार फरार, साथीदारांचा पीसीआर
कोट्यवधींच्या जमिनीच्या वादातून घडलेल्या या दरोड्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार सूरज लोलगे आणि मंगल यादव असल्याचा आरोप बिल्डर नरेश बरडे यांचे वकील अॅड. निशांत सिंघानिया यांनी केला. सूत्रधार गुंड आपल्या साथीदारांसह फरार असून, अटक केलेल्या नऊ आरोपींना पोलिसांनी कोर्टात हजर करून त्यांचा ७ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.