नागपूर सत्र न्यायालय : हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:46 IST2019-10-01T23:45:39+5:302019-10-01T23:46:42+5:30
सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे.

नागपूर सत्र न्यायालय : हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे. अतिरिक्त न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी मंगळवारी हनीसिंगला हा दिलासा दिला. हनीसिंगला यापूर्वीही दोन-तीनदा विदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
देश सोडण्यापूर्वी विदेशातील राहत्या ठिकाणचा पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, कार्यक्रमांची यादी व विमानाचे तिकीट याची माहिती तपास अधिकाऱ्याला देण्यात यावी. तसेच, देशात परत आल्यानंतर १० डिसेंबर रोजी या न्यायालयाला कळवावे, असे हनीसिंगला सांगण्यात आले आहे. हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी केलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्याने हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंडला जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज मंजूर झाला. हनीसिंगतर्फे अॅड. अतुल पांडे, जब्बलतर्फे अॅड. रसपालसिंग रेणू तर, सरकारतर्फे अॅड. नंदनवार यांनी कामकाज पाहिले.