आशासेविकांचे मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:01+5:302021-04-04T04:09:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : काेराेना संक्रमण काळात जीव धाेक्यात टाकून कार्य करणाऱ्या आशासेविकांना आधीच अल्प मानधन दिले जाते. ...

आशासेविकांचे मानधन रखडले
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेना संक्रमण काळात जीव धाेक्यात टाकून कार्य करणाऱ्या आशासेविकांना आधीच अल्प मानधन दिले जाते. त्यातच या संकटाच्या काळात त्यांना मागील तीन महिन्यापासून मानधनाचा एक रुपयादेखील मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागत असून, वारंवार मागणी करूनही त्यांना सुरक्षा किट पुरविण्यात आल्या नाहीत.
काेराेना संक्रमणाच्या संकट काळात आशासेविका आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून व जीव धाेक्यात घालून कार्य करीत आहेत. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत असताना त्यांची सेवाही सुरूच आहे. त्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल माेजणे, त्यांना औषधांचे वितरण करणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे यासह अन्य कामे करीत असल्याने, काेराेना संक्रमितांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात येतात. परंतु, काेराेनापासून स्वत:चा व पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी त्यांना प्रशासनाने फेसशिल्ड, पीपीई किट व तत्सम सुरक्षेची साधनेही अद्याप पुरविली नाहीत.
दरम्यान, मागील तीन महिन्यापासून त्यांना त्यांच्या मानधनाची रक्कमही देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांनाही ताेंड द्यावे लागत आहे. संकटाचा काळ आणि त्यांचे कार्य लक्षात घेता, त्यांना मानधनाची रक्कम तातडीने देण्यात यावी. तसेच त्यांना काेराेनापासून सुरक्षा करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच त्या काेराेना संक्रमण बनण्याची शक्यता बळावल्याने, शासनाने त्यांच्याकडे इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.
...
काेराेनामुळे मृत्यू
काेराेना संक्रमण काळात कार्य करीत असताना कामठी तालुक्यातील काही आशासेविकांना काेराेनाची लागण झाली हाेती. हीच प्रक्रिया काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातही सुरू आहे. यात बहुतांश काेराेना संक्रमित आशासेविकांनी काेराेनावर समर्थपणे मात केली. मात्र, कामठी तालुक्यात एका आशासेविकेचा शनिवारी (दि. ३) काेराेनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार काेण, कायम गेलेल्या व्यक्तीची विम्याच्या रकमेतून भरपाई हाेईल काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.