हनीसिंग व्हाईस रेकॉर्डिंगसाठी नागपुरात येणार
By Admin | Updated: February 19, 2015 02:06 IST2015-02-19T02:06:12+5:302015-02-19T02:06:12+5:30
अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह यांना..

हनीसिंग व्हाईस रेकॉर्डिंगसाठी नागपुरात येणार
नागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह यांना व्हाईस रेकॉर्डिंगसाठी २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी बुधवारी दिले. या अटीवर दोघांनाही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीच्या तारखेला सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळाली आहे.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाच्या आदेशामुळे दोघांनीही पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले. यानंतर, पोलिसांनी प्रतिज्ञापत्रावर दोघेही चौकशीला योग्य सहकार्य करीत नसल्याची माहिती देऊन अटकपूर्व जामीन अर्जांवर दोघांच्या उपस्थितीतच अंतिम सुनावणी घेण्याची विनंती केली होती. परिणामी २९ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने दोघांनाही अर्जांवरील अंतिम सुनावणीला व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात दोघांनीही पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने त्यांना २ मार्च रोजी व त्यानंतरही तपास अधिकाऱ्याला आवश्यक तेव्हा पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे निर्देश देऊन सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला.
पोलिसांनी कायद्यानुसार व्हाईस रेकॉर्डिंग घ्यावे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हनीसिंग व बादशाहच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे. त्याला अश्लील गाणी गाण्यापासून थांबविण्यात यावे असे तक्रारकर्ते जब्बल यांचे म्हणणे आहे. हनीसिंगतर्फे अॅड. अतुल पांडे, बादशाहतर्फे अॅड. रजनीश व्यास तर, शासनातर्फे एपीपी संदीप भागडे व मुकुंद एकरे यांनी बाजू मांडली. फौजदारी सहायक अविनाश अक्केवार यांनी पोलिसांना सहकार्य केले.
गप्प राहणे चुकीचे
इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेली अश्लील गाणी पायरेटेड असल्याचे हनीसिंग व बादशाहचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार वादग्रस्त गाणी दुसऱ्याने त्यांच्या आवाजात गायिली आहेत. परंतु, यासंदर्भात त्यांनी अद्यापही कोणावरच खटला दाखल केलेला नाही. यासंदर्भात न्यायालयाने खंत व्यक्त केली. कधी-कधी गप्प राहिल्यामुळे खोटेही सत्य वाटायला लागते असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
रिट याचिकेवरील सुनावणी तहकूब
हनीसिंग व बादशाहविरुद्ध उच्च न्यायालयात प्रलंबित जब्बल यांच्या फौजदारी रिट याचिकेवरील सुनावणी बुधवारी पोलिसांनी कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितल्यामुळे तहकूब करण्यात आली. पोलिसांनी हायकोर्टाच्या दणक्यानंतर दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.