मेयोमध्ये होमिओपॅथी अभ्यासक्रम
By Admin | Updated: November 21, 2015 03:24 IST2015-11-21T03:24:54+5:302015-11-21T03:24:54+5:30
राज्य मंत्रिमंडळाने होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक वर्षाचा ‘फॉर्माकॉलॉजी’ अभ्यासक्र म करून प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत कायद्याचे बळही दिले आहे.

मेयोमध्ये होमिओपॅथी अभ्यासक्रम
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिली मंजुरी : होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण
नागपूर : राज्य मंत्रिमंडळाने होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक वर्षाचा ‘फॉर्माकॉलॉजी’ अभ्यासक्र म करून प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत कायद्याचे बळही दिले आहे. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा अभ्यासक्रम सुरू करण्याला कॉलेज कौन्सिलने विरोध दर्शविल्याने अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याला ग्रहण लागले होते, परंतु आता ही जबाबदारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) घेतल्याने होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या अॅकॅडेमिक कौन्सिलमध्ये १० सप्टेंबर २०१५ रोजी होमिओपॅथी डॉक्टरांकरिता फार्माकॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक वर्षाचा हा अभ्यासक्रम नोव्हेंबर २०१५ पासून सुरू होणार होता. अभ्यासक्रमात थेअरी व प्रॅक्टिकल दोन्हींचा समावेश राहणार होता. हा अभ्यासक्रम नागपूरच्या मेडिकल, मेयोसह विदर्भात सहा ठिकाणी प्रस्तावित होता. परंतु मेडिकलच्या कॉलेज कौन्सिलमध्ये या अभ्यासक्रमाला विरोध दर्शवित तसा ठराव वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांना पाठविला. त्यात फार्माकॉलॉजीच्या शिक्षकांना त्यांच्या नियमित वर्गासह आधीच नर्सिंग, बीपीएमटी, डेंटलला अतिरिक्त शिकवावे लागत असल्याचे कारण देण्यात आले होते. याला घेऊन होमिओपॅथी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण होते. मेडिकल जबाबदारी झटकत असल्याचे पाहत मेयोमध्ये तरी हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने प्रयत्न सुरू केला.
या संदर्भातील प्रस्ताव मेयो प्रशासनाने विद्यापीठाकडे पाठविल्यानंतर २ नोव्हेंबरला मंजुरी मिळाली. त्या आशयाचे पत्र शुक्रवारी मेयो प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्या आधारे डिसेंबर २०१५ पासून ५० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)