संपाच्या नावावर रुग्णांना दाखविला घरचा रस्ता
By Admin | Updated: September 3, 2016 01:10 IST2016-09-03T01:10:12+5:302016-09-03T01:10:12+5:30
देशव्यापी संपाचा सर्वाधिक फटका शुक्रवारी प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना बसला.

संपाच्या नावावर रुग्णांना दाखविला घरचा रस्ता
प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रकार : मनोरुग्णांना नाश्ता, जेवण मिळण्यासही उशीर
नागपूर : देशव्यापी संपाचा सर्वाधिक फटका शुक्रवारी प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना बसला. येथील परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर गेल्याने मनोरुग्णांना सकाळचा नाश्ता तीन तास उशिरा मिळाला. यामुळे चिडलेल्या वॉर्ड क्र. १५ च्या रुग्णांनी दरवाजा तोडला. धक्कादायक म्हणजे, रुग्णालय प्रशासनाने संपाचे नियोजन केले नव्हते. परिणामी, बाह्यरुग्ण विभागात एकही रुग्णाला तपासण्यात आले नाही. बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांनाही खाली हात परतावे लागले.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संपात प्रादेशिक मनोरुग्णालयातील १५०वर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व ६०वर परिचारिका संपावर गेल्या. सूत्रानुसार, एक दिवसाआधी चतुर्थ श्रेण कर्मचाऱ्यांनी संपावर जात असल्याचे पत्र दिले होते, परंतु परिचारिकांनी विना पत्र देताच संपावर गेल्या. यामुळे मनोरुग्णांना आज बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. रुग्णालयातील वॉर्डातील दारे सकाळी ७ वाजता उघडून ७.३० वाजता रुग्णांना नाश्ता देण्याचा नियम आहे. परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजले तरी वॉर्डातील दरवाजे उघडले नव्हते. यामुळे चिडलेल्या वॉर्ड १५ मधील रुग्णांनी दरवाजाच तोडला. याची माहिती काही वरिष्ठ डॉक्टरांना मिळाल्यावर त्यांनी स्वच्छता सेवा कर्मचारी, सुरक्षा रक्षक व सुमारे १० परिचारिका ज्या संपावर गेल्या नव्हत्या यांच्या मदतीने १०.३० वाजता नाश्ता दिला. दुपारच्या जेवणातही उशीर झाला. कर्मचारी संपावर गेल्याने बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांचे नोंदणी पत्र तयार करणारी खिडकीही बंद होती. डॉक्टर होते पण त्यांच्या मदतीसाठी कोणीच नव्हते. यामुळे आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संपाची माहिती देऊन विनाउपचार खाली हात पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)