गृहमंत्र्यांचा पोलिसांना अजब सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:08 IST2021-01-18T04:08:04+5:302021-01-18T04:08:04+5:30

म्हणाले..., थकीत रक्कम वसूल करण्याचे कंत्राट द्या - ते करतील पठाणी वसुली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वाहतूक शाखेच्या ...

Home Minister's strange advice to police | गृहमंत्र्यांचा पोलिसांना अजब सल्ला

गृहमंत्र्यांचा पोलिसांना अजब सल्ला

म्हणाले..., थकीत रक्कम वसूल करण्याचे कंत्राट द्या - ते करतील पठाणी वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वाहतूक शाखेच्या ई-चालानचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याचे कंत्राट एखाद्या खासगी एजन्सीला द्या. ते पठाणी वसुली करतील, असा हसत हसत का होईना मात्र अजब सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर पोलिसांना दिला.

वाहतूक शाखेच्या पोलिसांना २०० बॉडी वोर्म कॅमेरे मिळाले आहे. त्याचे प्रात्यक्षिक आणि वितरण सोहळा रविवारी पोलीस जिमखान्यात पार पडला. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेशकुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी शहर वाहतूक शाखा पोलिसांकडे असलेल्या साधनसुविधा आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा प्रास्तविकातून सादर केला. तर , पोलीस आयुक्तांनी बॉडी कॅमेऱ्यामुळे वाहतूक शाखा पोलिसांना कशा चांगल्या पद्धतीने काम करता येईल, ते स्पष्ट केले. वाहतूक पोलीस नागरिकांसोबत उर्मट वर्तन करतात, अशा तक्रारी असतात. तर, वाहनचालक पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याची मजल मारतात. उलटसुलट आरोप करतात. या कॅमेरामध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगची व्यवस्था असल्याने नेमके काय घडले, ते लगेच स्पष्ट होईल. कॅमेरात सर्व रेकॉर्ड होत असल्याची कल्पना असल्याने वाहनचालक किंवा वाहतूक पोलीस सन्मानाने एकमेकांशी वागतील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

यानंतर गृहमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कॅमेराचा वापर सडकछाप मजनूगिरी करणाऱ्यांना आवरण्यासाठी करता येईल, असे त्यांनी सुचविले. हा कॅमेरा धारण केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला पुढे ठेवून काही अंतरावर आपले पोलीस पथक ठेवायचे. एकटी महिला पाहून कुणी समाजकंटक तिच्याशी अपमानास्पद वर्तन करत असेल तर बाजूलाच असलेले पोलीस लगेच धावून त्या समाजकंटकाला धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये असा प्रयोग झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागपुरात मांजाने गळा कापला गेल्याने एका तरुणाचा बळी गेला. या घटनेवर दु:ख व्यक्त करताना गृहमंत्री देशमुख यांनी शहर पोलिसांना मिळालेल्या अत्याधुनिक ड्रोनचा वापर करून अशा घटना टाळण्यासाठी तसेच समाज जागरणासाठी वापर करण्याची सूचना केली.

दरम्यान, वाहतूक शाखेचे ई-चालानचे १६ कोटी रुपये थकीत आहे. ही मोठी समस्या असून ते वसूल करण्यासाठी एखाद्या खासगी एजन्सीला कंत्राट द्या. ते पठाणी पद्धतीने वसूल करतील, असेही ते म्हणाले. गृहमंत्र्यांनी पोलिसांना हा सल्ला गमतीने दिला असला तरी तो चर्चेचा विषय ठरला आहे.

---

ड्रोनचे प्रात्यक्षिक

शहर पोलिसांना अत्याधुनिक ड्रोन मिळाले आहे. परिमंडळ पाचचे उपायुक्त नीलोत्पल यांनी त्याचे प्रात्यक्षिक सुरू असतानाच वैशिष्ट्ये सांगितली.

प्रसंगी २ हजार मीटर उंचीवरून अचूक छायाचित्रण करून सर्व्हिलन्स व्हॅनच्या माध्यमातून गर्दी किंवा ट्रॅफिक नियंत्रण, मोर्चा नियंत्रण करण्यास या ड्रोनचा केला जाऊ शकतो. मांजाने गळा कापल्याच्या घटनेनंतरही शहरात पतंगबाजीला उधाण आले होते. या ड्रोनच्या माध्यमातून हुल्लडबाजी, धोका निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांचे समुपदेशन करून संभाव्य घटना टाळल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

----

Web Title: Home Minister's strange advice to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.