अधिकाऱ्यांची कानउघाडणी!
By Admin | Updated: September 10, 2015 03:46 IST2015-09-10T03:46:51+5:302015-09-10T03:46:51+5:30
गेली दोन दिवस विदर्भातील निवडक सिंचन प्रकल्पाच्या पाहणीत विधिमंडळाच्या अंदाज समितीला काही धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत.

अधिकाऱ्यांची कानउघाडणी!
अंदाज समितीने अनुभवले तुरागोंदीतील वास्तव : अडीच कोटी मातीकामावर खर्च
नागपूर : गेली दोन दिवस विदर्भातील निवडक सिंचन प्रकल्पाच्या पाहणीत विधिमंडळाच्या अंदाज समितीला काही धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. याशिवाय प्रकल्पग्रस्त शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनीही अनेक बाबी समितीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. समितीने हे सर्व गांभीर्याने घेत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रकल्पांविषयी स्पष्टीकरण मागत माहिती असेल तरच बोला, स्पष्टीकरण खोटे आढळले तर कारवाई केली जाईल, असे समितीने अधिकाऱ्यांना सुनावले. यामुळे उडवाउडवीची उत्तरे देण्याच्या तयारीत असलेले अधिकारी सुन्न झाले.
शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील तुरागोंदी या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पावर १२ कोटी रुपये खर्च झाले असून पायव्यात काळी माती भरण्यावर अडीच कोटी रुपये खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी समितीला सांगितले. यावर समितीच्या बहुतांश सदस्यांचे समाधान झाले नाही. आजूबाजूला काळी माती उपलब्ध नाही. मग एवढी काळी माती कुठून आणली, खरोखरच ११ मीटर खोल काळी मातीचे भरण केले आहे का, हे आता कसे तपासता येईल, असे प्रश्न बऱ्याच सदस्यांनी उपस्थित केले. प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन समिती दुपारी नागपुरात परतली. समितीने दोन दिवसाच्या दौऱ्यात कार, सत्रापूर, बावनथडी व तुरागोंदी या प्रकल्पांची पाहणी केली.
बुधवारी तुरागोंदी प्रकल्पाच्या पाहणीनंतर समितीने विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. तीत नागपूर व भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी तसेच सिंचन विभागातील अधिकारी उपस्थित होते. समितीने चारही प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात आढळून आलेल्या त्रुटी व नागरिकांनी दिलेल्या तकर्रारींच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागविले व त्यांचे मत मांडण्यास प्रत्येकाला संधी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण नोंदवून घेण्यात आले. समितीचे सदस्य आ. मदन येरावार, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, चरण वाघमारे, बाळासाहेब मुरकुटे, डॉ. शशिकांत खेडेकर, विरेंद्र जगताप हे पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)