वर्षभरात सादर करता येणार सुटीचे प्रमाणपत्र

By Admin | Updated: April 3, 2017 03:03 IST2017-04-03T03:03:34+5:302017-04-03T03:03:34+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीचे नियम कडक केल्यामुळे ‘पीएचडी’ इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.

Holidays certificates to be presented during the year | वर्षभरात सादर करता येणार सुटीचे प्रमाणपत्र

वर्षभरात सादर करता येणार सुटीचे प्रमाणपत्र

नागपूर विद्यापीठ : संशोधनासाठी इच्छुक
उमेदवारांना दिलासा देण्याबाबत अंतिम निर्णय नाही
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीचे नियम कडक केल्यामुळे ‘पीएचडी’ इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने संभ्रम दूर केला असला तरी नागपूर विद्यापीठाने तीन वर्षांच्या सुट्यांच्या अटीत दिलासा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र ‘पीएचडी’साठी नोंदणी करण्यासाठी अनिवार्य असलेली सर्व प्रमाणपत्रे वर्षभरात सादर करण्याची सूट विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळाला असला तरी तीन वर्षांच्या सुटीची अट कधी रद्द होईल, हा प्रश्न मात्र त्यांच्यासमोर आहेच.
विद्यापीठाच्या नवीन नियमांनसार ‘पीएचडी’साठी नोंदणी करायची असेल तर संबंधित उमेदवारांनी आस्थापनांच्या व्यवस्थापनांकडून तीन वर्ष रजेचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र एका महिन्याच्या आत सादर केले तरच नोंदणी शक्य होणार आहे, असे ‘आरआरसी’च्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पीएचडी’ ही नियमित पूर्णकालीन पदवी असल्याचे नियमांत नमूद केले आहे. पूर्णकालीन पदवी असताना उमेदवार इतर शिक्षण किंवा इतर ठिकाणी नोकरी कशी करू शकणार असा तर्क ठेवत विद्यापीठाने ही अट लावली होती. याबाबत आयोगाकडेदेखील अनेक तक्रारी गेल्या. यावर अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्टीकरण जारी केले. ‘पीएचडी’ पदवी ही नियमित असली तरी ती पूर्णकालीन किंवा अंशकालीन तत्त्वावर घेतली जाऊ शकते. केवळ ती विद्यापीठांच्या नियमांच्या मर्यादेत असावी. केवळ दूरस्थ शिक्षण पद्धतीतून घेतलेल्या ‘पीएचडी’ पदवीला मान्यता राहणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठात अंशकालीन तत्त्वावरील ‘पीएचडी’संदर्भात कुठलेही नियम किंवा दिशानिर्देश अस्तित्वात नाहीत. त्यामुळे जून महिन्यापर्यंत हे दिशानिर्देश तयार करण्यात येतील व पुढील सत्रात त्यांची अंमलबजावणी होईल. मात्र तोपर्यंत यंदाच्या ‘आरआरसी’ने ज्यांचे ‘सिनॉप्सिस’ मंजूर केले आहेत, त्यांना लावण्यात आलेल्या तीन वर्षांच्या सुटीबाबत विद्यापीठाने अंतिम निर्णय घेतलेला नाही.
हे प्रमाणपत्र वर्षभराच्या आत कधीही सादर करता येणार आहे. तशी नियमांत तरतूदच आहे. ज्या दिवशी उमेदवार हे प्रमाणपत्र सादर करतील, त्या दिवशीपासून त्यांच्या नोंदणीचा दिनांक ग्राह्य धरण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
सुटीच्या अटीबाबत आम्ही सखोल विचार करून निर्णय घेऊ, असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Holidays certificates to be presented during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.