होळीचे रंग सोसायटीत उधळण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:57+5:302021-03-29T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, धुळवडीचा सण प्रत्येकांनी घरीच साजरा करावा. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी ...

होळीचे रंग सोसायटीत उधळण्यास बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, धुळवडीचा सण प्रत्येकांनी घरीच साजरा करावा. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायटीतील विविध परिवार एकत्र येऊन रंग खेळण्यावर बंदी आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन रंग खेळताना दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागला आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरातील संवेदनशील वस्त्या तसेच झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला असून, शनिवारी रात्रीपासून विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
होळी आणि धुळवडच्या दिवशी गुन्हेगारी वाढत असल्याचे लक्षात घेऊन शहरात यावेळी पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून साधेपणाने सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. पोलिसांची समाजकंटकांवर नजर आहे. मात्र, नागरिकांनी त्यांच्या परिसरात कुठे काही संशयास्पद हालचाल दिसली, तर तातडीने नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
हुल्लडबाजी करणारांची गय नाही
शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत. धुळवडीच्या दिवशी दारूच्या नशेत काही जण हुल्लडबाजी करतात. बेदरकारपणे वाहने चालवून आरडाओरड करतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी आणि वाहतूक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दुचाकीवर एकालाच फिरता येणार आहे. विनाकारण फिरणारांवर कारवाई करण्यासाठी शहरात ७५ फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे. ६६ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथके गस्त करत आहेत. गेल्या २४ तासांत २७३९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.