एचआयव्हीचे प्रमाण घटले, धोका वाढला!

By Admin | Updated: December 1, 2015 07:13 IST2015-12-01T07:13:18+5:302015-12-01T07:13:18+5:30

सरकारी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे राज्यातील एड्सचे प्रमाण कमी झाले आहे.

HIV levels decreased, risk increased! | एचआयव्हीचे प्रमाण घटले, धोका वाढला!

एचआयव्हीचे प्रमाण घटले, धोका वाढला!

स्वयंसेवी संस्थांचे अनुदान बंद : नियंत्रण व उपाययोजना करण्याचे कार्य प्रभावित
नागपूर : सरकारी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे राज्यातील एड्सचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून या सामाजिक संस्थांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) अनुदानासह कंडोम, गुप्तरोगाच्या किटस्, टेस्टिंग सिरींज आदी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने एचआयव्हीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मानधन मिळत नसल्याने अनेक संस्थांनी जनजागृतीचे व बाधितांना आवश्यक माहिती देण्याचे कार्य बंद केले आहे.
राज्यात एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ या काळात देहविक्रय करणाऱ्या ७७,५६७ महिलांची तपासणी करण्यात आली. यात ६५ महिलांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच समलिंगी संबंध असणाऱ्या २६,६१८ जणांची तपासणी झाली. त्यांपैकी १५ जणांना, इंजेक्शनद्वारे नशा करणाऱ्या २,३१९ पैकी ४ आणि ८६,८०३ ट्रकचालकांपैकी १२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे.
शून्य संसर्ग, मृत्यू आणि गैरसमज आदींवर भर दिला जात आहे. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीचा विचार करता, एचआयव्ही/एड्सचे रुग्ण घटल्याचे जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे म्हणणे आहे. याचे श्रेय राज्यात एचआयव्हीवर नियंत्रण व उपाययोजना करण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांना दिले जाते. राज्यात अशा १५४ स्वयंसेवी संस्था आहेत. यातील नागपुरात १४ आहेत. यात रेड क्रॉस सोसायटी युनिट - १, युनिट - २, गौरव संस्था, ऐबेआरजीन, सारथी ट्रस्ट, भारतीय आदिम जाती सेवक संघ, आयआयवायडब्ल्यू, सीआरटी डीपी, सह्याद्री संस्था, मानव विकास संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमध्ये जवळपास ३००० कौन्सिलर आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. नॅकोकडून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला (एम-सॅक) आणि येथून या संस्थांना दर सहा महिन्याने अनुदान दिले जाते. परंतु गेल्या फेब्रुवारी, मार्च आणि जून ते नोव्हेंबरपर्यंतचे असे आठ महिन्यांचे अनुदानच देण्यात आले नाही. याशिवाय गुप्तरोगाच्या किटस् (एसटीआय), कंडोम्स, रक्ताच्या चाचणीसाठी टेस्टिंग सिरीज व ट्यूब आदींच्या मागणीनुसार फारच कमी पुरवठा होत असल्याने कार्यकर्ते अडचणीत आले असून, त्यांच्यावरील जबाबदारींवर याचा परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)
अडचणी वाढल्या
४नागपूरच्या ‘रेड लाईट एरिया’मध्ये सुमारे चार हजार वारांगना आहेत. यातील सुमारे १२५ वारांगना एचआयव्हीबाधित आहेत. या भागात महिन्याकाठी एक-दीड लाख कंडोमची गरज भासते. परंतु येथे काम करणाऱ्या संस्थेला गेल्या आठ महिन्यात केवळ दीड लाख कंडोम पाठविण्यात आले आहे. याचा परिणाम, एचआयव्ही वाढण्यास मदत होण्याची दाट शक्यता आहे, असे मत या भागात काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आहे.

Web Title: HIV levels decreased, risk increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.