उपशास्त्रीय संगीताने बहरलेला ‘हिट्स आॅफ मन्नाडे’
By Admin | Updated: October 13, 2014 01:17 IST2014-10-13T01:17:24+5:302014-10-13T01:17:24+5:30
मन्ना दा म्हणजे सुरांचे बादशहाच. मन्नादांच्या स्वरांचा परिसस्पर्श लाभलेले जवळपास प्रत्येकच गीत हिट झाले आहे. मन्नादांनी गायिलेली सर्वच गीते लोकप्रिय आहेत. मृदु आणि स्वरांवर हुकूमत

उपशास्त्रीय संगीताने बहरलेला ‘हिट्स आॅफ मन्नाडे’
स्वरतरंग संगीत अकादमीचे सादरीकरण : सुरेल गीतांनी रसिक नॉस्टेल्जिक
नागपूर : मन्ना दा म्हणजे सुरांचे बादशहाच. मन्नादांच्या स्वरांचा परिसस्पर्श लाभलेले जवळपास प्रत्येकच गीत हिट झाले आहे. मन्नादांनी गायिलेली सर्वच गीते लोकप्रिय आहेत. मृदु आणि स्वरांवर हुकूमत गाजवित तिन्ही सप्तकांत फिरणारा मन्नादांचा आवाज रसिकांच्या मनावर गारुड करणारा आहे. मन्नादांनी गायिलेल्या गीतांचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्य आहे. गीताचा आशय आणि भावना नेमकेपणाने स्वरांतून व्यक्त करण्याची त्यांचे कौशल्य वादातीत आहेच पण त्यांच्या प्रत्येक गीतातून त्यांच्यातला प्रगल्भ गायक झळकतो. त्यामुळे मन्नादांची गीते सादर करणे हे गायकांसाठी नेहमीच आव्हान राहिले आहे. मन्नादांनी गायिलेल्या लोकप्रिय गीतांचे तयारीने सादरीकरण करीत स्वरतरंग अकादमीच्या कलावंतांनी रसिकांना आनंद दिला.
स्टेट बँक आॅफ इंडिया आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम स्वरतरंग अकादमीच्या कलावंतांनी सादर केला. अकादमीचे संचालक आणि प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. मन्नादांची कठीण आणि बहुतेक उपशास्त्रीय गीतांचे सादरीकरण निरंजनने नजाकतीने करून अनेक गीतांना वन्समोअर घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ निरंजनने ‘तु प्यार का सागर है...’ या गीताने केला. यानंतर त्याने ‘जिंदगी कैसी है पहेली हाये..., छम छम बाजे रे पायलिया..., पुछो ना कैसे मैने रैन बितायी...’ ही गीते सादर करून प्रारंभीच रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या. शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गीतांच्या जागा, आलापी, ताना निरंजनने तबीयतीने सादर केल्याने कार्यक्रम प्रारंभापासूनच रंगतदार झाला. यानंतर निरंजननने श्रेया खराबेसह ‘दिल की गीरह खोल दो...’ आणि मंजिरी वैद्यसह ‘प्यार हुआ इकरार हुआ...’ या युगुलगीतांनी मजा आणली. याप्रसंगी मन्नादांनी गायिलेल्या विनोदी, गंभीर आणि प्रेमगीतांसह आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगणारीही गीते सादर करण्यात आल्याने भावनांच्या हिंदोळ्यावर रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. याप्रसंगी निरंजन आणि गौरी गायकवाड यांनी ‘चुनरी संभाल गोरी...’ तयारीने सादर केले. आनंद चिमोटेने ‘आयो कहां से घनश्याम’ या गीताने रसिकांची दाद घेतली. सुनील यांनीही यावेळी काही गीतांनी टाळ्या घेतल्या.
‘झुमता मोसम मस्त महिना, केतकी गुलाब जुही, आजा सनम मधुर चांदनी मे हम, एक चतुर नार, ये रात भिगी भिगी, यारी है इमान मेरा, लागा चुनरी मे दाग’ आदी गीतांनी मन्नादांच्या गीताची मैफिल रंगली. श्वेता शेलगावकर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची उंची गाठली. तबल्यावर श्रीकांत सूर्यवंशी, ड्रमसेटवर सुभाष वानखेडे, कोंगोवर रघुनंदन परसटवार, सिंथेसायझरवर महेन्द्र ढोले आणि अक्षय आचार्य, गिटारवर प्रसन्न वानखेडे यांनी सुरेल साथसंगत केली. ध्वनिव्यवस्था आॅडिओलॉजीचे स्वप्निल उके आणि सोनु, प्रकाशयोजना विशाल यादव आणि मंचसज्जा राजेश अमीन यांची होती. व्हिडीओ जावेद यांचा होता. मन्नादांच्या गीतांचा सुरेल गुलदस्ता सायंकाळ आनंदी करणारा होता. (प्रतिनिधी)