पारंपरिक ‘डायका’ला हायटेक टच
By Admin | Updated: June 6, 2017 02:00 IST2017-06-06T02:00:11+5:302017-06-06T02:00:11+5:30
घरच्या लग्नसोहळ्याच्या वेळी मृत पावलेल्या नातेवाईक आणि आप्तांना आमंत्रित करण्यासाठी हिंदू धर्मात डायका हा प्रकार प्रसिद्ध होता.

पारंपरिक ‘डायका’ला हायटेक टच
लग्नासाठी पूर्वजांना आमंत्रित करणारी परंपरा आता नव्या स्वरुपात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरच्या लग्नसोहळ्याच्या वेळी मृत पावलेल्या नातेवाईक आणि आप्तांना आमंत्रित करण्यासाठी हिंदू धर्मात डायका हा प्रकार प्रसिद्ध होता. काळाच्या ओघात ही पारंपरिक संगीत परंपरा लोप पावत चालली आहे. ही परंपरा जिवंत रहावी व नव्या पिढीला त्यात जोडता यावे म्हणून पारंपरिक डायका प्रकाराला हायटेक स्वरूप देण्याचा प्रयत्न खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या पत्नी डॉ. सुनिता महात्मे यांनी चालविला आहे. अलीकडेच कुटुंबातील एका लग्नसोहळ्यात ‘डायका’ चे नवे स्वरुप त्यांनी सादर केले.
घरच्या लग्नसोहळ्यात प्रत्येक नातेवाईक उपस्थित राहावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. अगदी जग सोडून गेलेले नातेवाईकही उपस्थित असायला हवे होते, अशी चटका लावणारी खंत प्रत्येकाला वाटते. डायका हा असाच मृत नातेवाईकांच्या आठवणींना उजाळा देणारा पारंपरिक प्रकार. हे मृत पावलेले लोक आता कधी येणार नाहीच, हे सत्य असूनही त्यांना संगीत वाद्याच्या माध्यमातून लग्नाचे निमंत्रण देणारी ही प्रथा. तमाशा, गोंधळाच्या संचाप्रमाणे डायका गाणारे संचही लोकप्रिय होते. लग्नाच्या आदल्या रात्री या डायका गाणाऱ्यांना बोलावण्यात येते. पुढे कुटुंबातील प्रत्येक मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव घेत, त्यांचे कर्तृत्व आठवत तालासुरात त्यांना लग्नात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. घुंगरू बांधलेले ढोलक वाद्य, टाळ आदी वाद्यांच्या संगीतासह आरोळ्या देत मृतांना आवाहन केले जायचे. रात्रभर चालणारा संगीताचा हा फड इतका भावनिक असायचा की, सोडून गेलेल्या आप्तांच्या आठवणीत कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. अशाप्रकारे कुटुंबातील मृत आत्म्यांची आराधना केल्याने समोर होणारा लग्नसोहळा सुरळीत पार पडेल, ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असायची.
काळाच्या ओघात ही पारंपरिक प्रथा लोप पावली आहे. शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही हा प्रकार दिसेनासा झाला आहे. अनेकांना डायकाच्या प्रथेबाबत माहितीही नाही. डायका गाणाऱ्यांच्या आरोळ्या व वाद्यांचा आवाज तरुणांना कर्णकर्कश वाटतो. लग्नाच्या गडबडीने आता नवे रूप घेतले असून धकाधकीत मृत नातेवाईकांची आठवण कुणाला राहत नाही.
त्यामुळेच की काय डायका हा प्रकार इतिहासजमा झाला आहे. मात्र कुटुंबातील मृत सदस्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या प्रथेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुनिता महात्मे यांनी चालविला आहे. डायका प्रकाराला हायटेक स्वरूप देऊन नव्या पिढीला जोडण्यासाठी त्या धडपड करीत आहेत.
डॉ. सुनिता महात्मे यांच्या माहेरच्या वैरागडे कुटुंबात अभिजित व अश्विनी यांचा लग्नसोहळा अलीकडेच पार पडला. या लग्नाच्या आदल्या दिवशी मृतांची आठवण काढणारा ‘डायका’ सादर करण्यात आला. त्या व त्यांचे भाऊ व वराचे वडील जयंत वैरागडे यांच्या संकल्पनेतून या डायकाला तंत्रज्ञाची जोड दिली आहे. जुन्या पिढीतील हयात नसलेल्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचे वर्णन करणारी डायकाला साजेशी गाणी डॉ. सुनिता महात्मे यांनी तयार केली आहेत. यावेळी डॉ.सुनिता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मृत आप्तांचे स्मरण करणारी गाणी सादर केली. यावेळी फोटो स्लाईडच्या माध्यमातून नव्या पिढीला त्यांच्या आप्तांची ओळख करून देण्यात आली.
मृत आप्तांच्या कर्तृत्वाचे वर्णन करणारा डायका सादर करताना पारंपरिक वाद्यांसह काही आधुनिक वाद्यांची जोडही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या प्रत्येकाला एक दिवस हे जग सोडून जायचे आहे. मात्र आपली पिढी आपले अस्तित्व दर्शविणार आहे. त्यामुळे जाताना चांगल्या आठवणी ठेवून जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुटुंबातील संवाद वाढून नातेसंबंध जोपासणे व टिकविणे कसे आवश्यक आहे, हा संदेश या डायकाच्या माध्यमातून देण्यात आला.
-डॉ. सुनिता महात्मे.