लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्याहून कोलकाता येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती शेजारच्या नाल्यात कोसळली. यात मृतकाच्या नातेवाईकासह रुग्णवाहिकेच्या चालकाचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबियांवर दुहेरी आघात झाला आहे.
कन्हाई बिश्वास (कोलकाता) यांचा पुण्यात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अबिर बिश्वास (१४) व नातेवाईक पंकज बिश्वास (४०, नदिया, पश्चिम बंगाल) हे पुण्यावरून रुग्णावाहिकेने मृतदेह कोलकात्याकडे घेऊन निघाले होते. शिवाजी खल्लू भांबुरे (४०, पुणे) हे रुग्णवाहिका चालवत होते. सोबत शेखर उत्तम पवार (३५, अण्णाभाऊ साठेनगर, पुणे) हा क्लिनर म्हणून रुग्णवाहिकेत होता. बुधवारी साडेपाच वाजताच्या सुमारास नागपूर जबलपूर महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोरील पिपळा बोगद्याच्या बाजुला अचानक रुग्णवाहिका बिघडली. त्यामुळे रुग्णवाहिकेला रस्त्यावर उभी ठेवून पवार जवळील पेट्रोल पंपावर मेकॅनिक आणण्यासाठी गेला. त्यावेळी अज्ञात भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली व त्यात ती २० ते २५ फूट खाली नाल्यात पडली. चालक शिवाजी भांबुरे व पंकज बिश्वास हे दोघेही त्यात गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकारामुळे मृतक कन्हाई बिश्वास यांच्या मुलाला मोठा धक्का बसला. कोलकाता येथे त्यांच्या कुटुंबियांना या दुर्घटनेबाबत कळविण्यात आले. पवारच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.