इतिहासाचा अभ्यास आवश्यक, दडपण नको
By Admin | Updated: June 29, 2015 03:12 IST2015-06-29T03:12:05+5:302015-06-29T03:12:05+5:30
मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

इतिहासाचा अभ्यास आवश्यक, दडपण नको
श्री.मा. भावे : इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे? विषयावर व्याख्यान
नागपूर : मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण इतिहासात घडलेल्या घटना आपण पाहिलेल्या नसतात आणि त्याचे लेखन करणाऱ्या इतिहासकाराकडून त्याची मते आणि विश्लेषण होण्याचा संभव व शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतांचा निवाडा करणे इतिहासाच्या बाबतीत गरजेचे आहे. त्यामुळेच इतिहास नेहमीच महत्त्वाचा ठरतो. पण इतिहासाचे दडपण घेऊन वागणे मात्र समाजहिताचे नाही, असे मत पुण्याच्या भारत इतिहास मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघ, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे?’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. भावे म्हणाले, इतिहास भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आणि समाजाला उन्नत करण्यासाठी महत्त्वाचा असतो. पण इतिहासाने निर्माण केलेले प्रश्न इतिहासातच शोधण्याचा प्रयत्न करताना अकारण वर्तमानात अनेक अपसमज निर्माण होतात. त्यापेक्षा इतिहासाच्या अभ्यासातून आपले वर्तमान सकारात्मकतेने बदलविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. इतिहासाचे सारेच लेखन खरे आहे, असे मानण्यातही फारसा अर्थ नाही. व्यक्ती आणि कालसापेक्ष बदल इतिहासात होतात. नेपोलियन हरला किंवा बखर लिहिणाऱ्यांचा नेमका हेतू काय? हे समजून घेणेही आवश्यक आहे. जर्मनीच्या रांके या इतिहासकाराने इतिहास लिहिताना सर्व दस्तावेज आणि पुरावे तपासूनच लेखन करावे, असा सिद्धांत मांडला. पण मार्क्सने इतिहासाचे सूत्र शोधून तो उलगडण्याचा प्रयत्न करावा, असा सिद्धांत मांडला. उत्पादनाची साधने बदलली की समाजात परिवर्तन होते. या परिवर्तनाचा विचार इतिहासात असला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले होते. याशिवाय देश, स्थलकाल आणि संस्कृतीसापेक्षतेनेही इतिहासात बदल होतो. त्यामुळे या साऱ्याच घटकांचा विचार करणे भाग आहे. यासाठी त्यांनी अनेक जागतिक उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. याप्रसंगी डॉ. श्रीपाद चितळे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जोशी म्हणाले, कुठलाही गर्व न बाळगता आपला इतिहास शोधता येतो, हे भावे यांनी उलगडले आहे.
इतिहासात आपले मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना आपण आपले वर्तमानही शोधतो. त्यामुळेच इतिहासाकडे आपण निकोप दृष्टीने पाहू शकत नाही. (प्रतिनिधी)