निवडणूक जिंकून घडवला इतिहास ! डॉ. मंजुषा गिरी बनल्या ‘आयएमए’ महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष
By सुमेध वाघमार | Updated: September 15, 2025 19:31 IST2025-09-15T19:30:16+5:302025-09-15T19:31:51+5:30
Nagpur : डॉ. गिरी यांची निवड वैद्यकीय क्षेत्रात महिलांना नेतृत्वस्थानी आणण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल मानले जात आहे.

History created by winning the election! Dr. Manjusha Giri becomes the first woman president of IMA Maharashtra
नागपूर : डॉ. मंजुषा प्रमोद गिरी (साकला) यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवला आहे. त्या ‘आयएमए’ महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. हा विजय केवळ त्यांचा वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर नागपूरसाठीही अभिमानाचा क्षण आहे.
प्रसिद्ध न्युरोडेव्हलपमेंटल बालरोगतज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलांच्या समुपदेशक म्हणून डॉ. गिरी कार्यरत आहेत. नागपुरातील न्यूरॉन ब्रेन स्पाईन अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या त्या संचालिका आहेत. २०२४-२५ मध्ये त्यांनी ‘आयएमए’ नागपूरचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. गिरी यांच्याकडे वैद्यकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि वैद्यकीय समुदायाला बळकट करण्याची दूरदृष्टी आहे. त्या नोव्हेंबर २०२६ मध्ये अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. विजय मिळाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गिरी म्हणाल्या, हा माझा विजय नाही, तर प्रत्येक ‘आयएमए’ सदस्याचा, माझ्यापाठीशी असलेल्या माझ्या कुटुंबियांचा आणि मित्रांचा आहे. आपण सर्वजण मिळून ‘आयएमए’ महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाऊ, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. गिरी यांची निवड वैद्यकीय क्षेत्रात महिलांना नेतृत्वस्थानी आणण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल मानले जात आहे. हे यश तरुण डॉक्टरांसाठी, विशेषत: महिलांना उत्साहित करणारे आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वांना सोबत घेऊन प्रगतीशील सुधारणा होईल आणि राज्यातील डॉक्टरांचा सामूहिक आवाज अधिक मजबूत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.