स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण जयस्तंभ

By Admin | Updated: July 11, 2014 01:22 IST2014-07-11T01:22:16+5:302014-07-11T01:22:16+5:30

देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून

Historical memory of independence Jaythaab | स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण जयस्तंभ

स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण जयस्तंभ

नव्याने उभारणार : मूळ स्वरूप कायम राहणार
नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून या ऐतिहासिक स्मारकाचे मूळ स्वरूप मात्र कायम ठेवण्यात येणार आहे.
‘शहिदो की चितोओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालो का, यही बाकी निशां होगा’ जेव्हा-जेव्हा शहिदांची आठवण होत असते, ही ओळ आपसूकच ओठांवर येते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकं शहीद झालीत. या शहिदांच्या स्मृतीत प्रत्येक शहरांमध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले. त्याचधर्तीवर भारताच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून देशातील प्रत्येक शहरात ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले होते. नागपुरात रेल्वे स्टेशन चौकात रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर (डीआरएम आॅफिस) १५ आॅगस्ट १९४७ रोजी ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले. जयस्तंभ हे केवळ एक स्मारक नव्हे तर ते देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. या स्तंभाच्या चारही बाजूंनी अशोक चक्र अंकीत होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन पहिले मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ला आणि गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांच्या हस्ते जयस्तंभचे लोकार्पण करण्यात आले होते. काही वर्षानंतर त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. परंतु कालांतराने या जयस्तंभाची प्रचंड उपेक्षा करण्यात आली. जयस्तंभच्या चारही बाजूंनी जाहिरातीचेच फलक अधिक लागलेले राहायचे. स्तंभाजवळ असलेले पाण्याचे फवारे बंद पडले. अशोक चक्रही तुटून पडले होते. कम्पाऊंडच्या आत दगड माती जमा झाली होती.
दरम्यान नागपूर त्रिशताब्दी वर्षात नागपुरातील रस्ते रुंदीकरण करण्यात आले. तेव्हा जे पुतळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत होते ते हटवून त्याच चौकात नवीन स्वरूपात बसविण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळा आणि झांशी राणी चौकातील राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा त्याच चौकात रोडला लागून वसविण्यात आले. परंतु रेल्वे स्टेशन चौकातील ‘जयस्तंभ’ मात्र तसाच राहिला. रेल्वे स्टेशन चौक हा अतिशय वर्दळीचा चौक आहे. रामझुल्याचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुलावरून येणारया वाहतुकीचा विचार केल्यास जयस्तंभ वाहतुकीसाठी अतिशय अडचणीचा ठरत होता. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने ‘जयस्तंभ’ हटविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री स्तंभ हटविण्याची कारवाई करण्यात आली. नागपुरातील इतर पुतळे ज्या पद्धतीने हटवून त्याच चौकात रस्त्यालगत उभारण्यात आलेत, त्याच धर्तीवर जयस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबेसुद्धा हजर होते. रेल्वे स्टेशन चौकातच आर्मीच्या आॅफिसला लागून महापालिकेच्या जुन्या आॅक्ट्रॉयची जागा आहे. या जागेवर जयस्तंभ लवकरच नव्याने उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Historical memory of independence Jaythaab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.