हायकोर्टात वकिलाला मारहाण
By Admin | Updated: September 28, 2016 03:18 IST2016-09-28T03:18:53+5:302016-09-28T03:18:53+5:30
ओळखीच्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी

हायकोर्टात वकिलाला मारहाण
खांबोरकरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा : दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी
नागपूर : ओळखीच्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी अॅड नितीन धनंजय खांबोरकर (रा.सृष्टी संकुल अपार्टमेंट, बोले पेट्रोल पंपाजवळ) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे महिलेच्या पतीने मारहाण करून धमकावल्याची तक्रार अॅड. खांबोरकर यांनी नोंदविल्यावरून सदर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
अॅड. खांबोरकर आणि पीडित महिला तसेच तिचा पती यांची जुनीच ओळख आहे. अॅड खांबोरकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनीच महिलेचे कन्यादान करून लग्न लावून दिले होते. गेल्या काही दिवसांपासून अॅड. खांबोरकर महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करीत असल्याचे महिलेने पतीला सांगितले. त्यामुळे महिलेच्या पतीने अॅड. खांबोरकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता उच्च न्यायालयाच्या परिसरात अॅड. खांबोरकर आणि पीडित महिला व तिचा पती चर्चेला आले. कक्ष क्रमांक १ जवळ त्यांच्यात चर्चा सुरू होती. संवेदनशील मुद्यावरून वाद वाढल्यानंतर महिलेच्या पतीने अॅड. खांबोरकर यांना मारहाण केली. काही वकिलांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण तात्पुरते निवळले. मात्र, या घटनेमुळे विधी वर्तुळासह सर्वत्र चर्चेला उधाण आले.
दरम्यान, पीडित दाम्पत्य आणि अॅड. खांबोरकर सदर पोलिसांकडे पोहचले. अॅड. खांबोरकर यांनी पीडित महिलेनेच आपल्याला मेसेज केले होते, तेच तिला परत पाठविले, असे सांगून तिच्या पतीने आपल्याला मारहाण केली आणि पाहून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. त्यावरून सदर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
महिला प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत राहते. पीडित दाम्पत्य प्रतापनगर ठाण्यात पोहचले. अॅड. खांबोरकर यांच्या मोबाईलवरून आलेले काही मेसेज दाखवत महिलेने विनयभंगाची तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी अॅड.खांबोरकरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कुणाला अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)