अपहृत व्यक्तीची हत्या
By Admin | Updated: December 14, 2015 03:19 IST2015-12-14T03:19:09+5:302015-12-14T03:19:09+5:30
चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या आयुर्वेद रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह अखेर पोलिसांच्या हाती लागला.

अपहृत व्यक्तीची हत्या
अवैध सावकारी भोवली : कर्ज बुडविण्यासाठी सुपारी देऊन हत्या
नागपूर : चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या आयुर्वेद रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह अखेर पोलिसांच्या हाती लागला. कर्जदाराने कर्जाची रक्कम बुडविण्यासाठी सुपारी देऊन हे अपहरण आणि हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून, सक्करदरा पोलिसांनी आरोपी लोकेश तोंदवाल (वय २७) तसेच शिवम वैद्य (२२) या दोघांना अटक केली तर, त्यांचा आकाश तिड़के नामक साथीदार फरार आहे.
प्रकाश बडवेकर (वय ५७) असे मृताचे नाव आहे. ते आयुर्वेदिक रुग्णालयात अटेन्डंट म्हणून सेवारत होते. नोकरीसोबतच ते अवैध सावकारीही करायचे. नेहमीप्रमाणे कर्तव्य आटोपून बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजता ते हनुमाननगरातील विकी पान शॉप जवळ आले. तेवढ्यात तीन ते चार आरोपींनी त्यांना आपल्या कारमध्ये बसवले आणि सुसाट वेगाने पळून गेले. रात्र झाली, दुसरा दिवस गेला तरी बडवेकर घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी बडवेकर यांची शोधाशोध केली तेव्हा त्यांचे अपहरण झाल्याची माहिती पुढे आली. त्यावरून ज्योती प्रकाश बडवेकर (रा. मानेवाडा) यांनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन दिवस होऊनही बडवेकरचा पत्ता लागत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या संपर्कातील व्यक्तीवर नजर रोखली. आरोपी लोकेशसोबत त्यांचा काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारातून वाद सुरू असल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
पोलिसांना रात्रभर फिरविले
पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, सहायक आयुक्त बाबासाहेब बुधवंत यांनी आरोपी लोकेशची झाडाझडती घेतली. मध्यरात्री त्याने बडवेकरचे अपहरण करून हत्येची कबुली दिली. मात्र, मृतदेह दाखवण्यासाठी त्याने पोलिसांची रात्रभर दिशाभूल केली. कधी इकडे तर कधी तिकडे तो पोलिसांना फिरवत होता. मध्येच मृतदेह कुठे फेकला ते आठवत नसल्याचे सांगत होता. सकाळी सकाळी पोलिसांनी त्याची ‘नैसर्गिक नाकेबंदी‘ केल्यानंतर त्याने बडवेकरांचा मृतदेह दाखवला. त्यानंतर अपहरण आणि हत्येचा घटनाक्रम सांगितला.
त्यानुसार, आरोपी लोकेश बडवेकरसोबतच चपराशी म्हणून रुग्णालायत काम करायचा. बडवेकर ५ ते ६ भीसीमध्ये पैसे टाकत होते. त्यांच्यामुळेच लोकेशलाही भीसीची लत लागली. दारूचेही व्यसन होतेच. त्याची पूर्तता करण्यासाठी लोकेशने बडवेकरकडून व्याजाने ९० हजार रुपये घेतले. ती रक्कम परत घेण्यासाठी बडवेकरने लोकेशमागे तगादा लावला होता. अलीकडे बडवेकर त्याला नको त्या भाषेत चारचौघांसमोर बोलायचे, धमक्याही द्यायचे.
वारंवार अपमान होत असल्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने बडवेकरचा गेम करण्याचे कारस्थान रचले. त्यासाठी त्याने वैद्य आणि तिडकेची मदत घेतली. या दोघांना ५० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याने बडवेकरचा गेम करण्याची योजना सांगितली. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी बडवेकर यांना रक्कम देतो, असे सांगून लोकेशने पान टपरीजवळ बोलवले. बडवेकर तेथे दुचाकीने आले. आपली दुचाकी बाजूला ठेवून ते कारजवळ जाताच आरोपींनी त्यांना आत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना बेसा परिसरात निर्जन ठिकाणी नेले. तेथे यथेच्छ दारू पाजल्यानंतर या तिघांनी बडवेकरची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला. यानंतर आरोपी काहीच झाले नाही, या थाटात वागत होते. मात्र, कारमुळे लोकेश पोलिसांच्या हातात सापडला आणि नंतर त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बडवेकरचा मृतदेह ताब्यात घेतला. लोकेशचा साथीदार वैद्य यालाही ताब्यात घेतले. तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसात पैशाच्या व्यवहारातून हत्या झाल्याचे हे दुसरे प्रकरण आहे. जरीपटक्यातील दोन भावंडांचे अपहरण केल्यानंतर एका नराधमाने मुलीवर अत्याचार केला आणि नंतर तिच्या भावाची हत्या केली. या दोघांचेही मृतदेह आरोपीने छपरा (मध्यप्रदेश) जवळच्या नदीच्या पात्रात फेकून दिले.