राज्यमार्ग बनलाय मृत्यूमार्ग
By Admin | Updated: June 7, 2015 02:56 IST2015-06-07T02:56:17+5:302015-06-07T02:56:17+5:30
हल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढतो आहे.

राज्यमार्ग बनलाय मृत्यूमार्ग
शरद मिरे भिवापूर
हल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढतो आहे. जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या मार्गावर भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ विविध अपघात झाले. या अपघातांमध्ये १४ जणांना प्राणास मुकावे लागले तर, १६ जण जखमी व्हावे लागले. त्यामुळे हा मार्ग आता ‘मृत्यूमार्ग’ बनत चालला आहे.
भिवापूर हे नागपूर- गडचिरोली राज्य महामार्ग क्रमांक - ९ वरील नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण! या मार्गावरून नागपूर - गडचिरोली, नागपूर - चंद्रपूर, नागपूर - भंडारा - गोंदिया व पुढे आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणारी वाहने धावतात. या वाहनांमध्ये एसटी बसेस, ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसेस, इतर प्रवासी वाहने, ट्रक, रेती, गिट्टी, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने अव्याहतपणे धावत असतात. गोसेखुर्द प्रकल्प, मोखेबर्डी व आंभोरा उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या वाहतुकीत आणखी भर पडली आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागपूर ते नागभीड (जिल्हा चंद्रपूर) या ११० कि.मी. अंतराच्या राज्यमार्गाची अक्षरश: वाट लागली आहे. मार्गावरील खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मार्ग राज्य महामार्ग असला तरी, त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे ‘ओव्हरटेक’ करण्याच्या प्रयत्नात जड वाहने पायी चालणाऱ्यांना उडविण्याच्या घटना या मार्गावर सामान्य झाल्या आहेत. या अपघातांमधील अर्धे अपघात सुसाट वेग आणि दारू पिऊन वाहने चालविल्याने झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या वाहनांच्या वेगावर सध्या कुणाचेही नियंत्रण राहिले नाही.
वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यांच्याविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत वाहनचालकांची तपासणी केली जात नाही. सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असतो.