महामार्ग की ‘मृत्यूमार्ग’

By Admin | Updated: July 13, 2015 02:26 IST2015-07-13T02:26:48+5:302015-07-13T02:26:48+5:30

प्रादेशिक महामार्ग पोलिसांच्या हद्दीत होणाऱ्या अपघातात मृतांचे प्रमाण काही काळापासून वाढीस लागले आहे.

Highway 'death way' | महामार्ग की ‘मृत्यूमार्ग’

महामार्ग की ‘मृत्यूमार्ग’

नागपूर : प्रादेशिक महामार्ग पोलिसांच्या हद्दीत होणाऱ्या अपघातात मृतांचे प्रमाण काही काळापासून वाढीस लागले आहे. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर गेल्या अडीच वर्षात विविध प्रकारच्या साडेचार हजारांहून अधिक अपघातांमध्ये २८८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर या अपघातांची सरासरी काढली तर दिवसाला पाच अपघातांमध्ये तीन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी महामार्ग पोलिसांच्या नागपूर प्रादेशिक विभागाला माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ मे २०१५ या अडीच वर्षांच्या कालावधीत विभागाच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर झालेले अपघात, मृत झालेल्या व्यक्ती, पोलिसांचे संख्यबळ इत्यादी प्रकारची विचारणा यात करण्यात आली होती. महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाने १५ जून २०१५ पर्यंतची आकडेवारी दिली. या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग ६, ७ व ६९ वर १८७१ अपघात झाले. यात ११४२ नागरिकांचा जीव गेला. याच कालावधीत राज्य महामार्गांवर २८९२ अपघात झाले व यात १७४२ नागरिकांचा बळी गेला.
‘ट्रक’च्या वेगावर हवे नियंत्रण
महामार्गांवर सर्वात जास्त वर्दळ ‘ट्रक’ची दिसून येते. अनेकदा ट्रकचालक नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत असतात. यातूनच अनेकदा अपघात झाल्याचे दिसून येते. या अडीच वर्षांत ट्रकचे अपघात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४७६३ अपघातांपैकी ९४९ अपघात हे चक्क ट्रकने झाले आहेत.

Web Title: Highway 'death way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.