तापमानाची उंच उडी, चंद्रपूर ४६.२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:25+5:302021-05-30T04:07:25+5:30
नागपूर : चक्रीवादळामुळे बदललेल्या वातावरणाचा परिणाम जाणवत असल्याने, यंदाचा नवतपा ४३ अंशाच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज होता. मात्र, ...

तापमानाची उंच उडी, चंद्रपूर ४६.२ वर
नागपूर : चक्रीवादळामुळे बदललेल्या वातावरणाचा परिणाम जाणवत असल्याने, यंदाचा नवतपा ४३ अंशाच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज होता. मात्र, तापमानाने शनिवारी अचानक उंच उडी घेतली. चंद्रपूरचे तापमान एकाच दिवसात ४ अंश सेल्सिअसने वाढले, तर नागपूरच्या पाऱ्यातही ०.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील शनिवारचे चंद्रपुरातील तापमान विदर्भात सर्वाधिक ठरले आहे.
चंद्रपूरलगतच्या वणी परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोराचा पाऊस झाला असताना, चंद्रपुरातील शनिवारचे तापमान ४६.२ वर पोहोचले. वातावरणात सकाळपासूनच शुष्कता होती. सकाळी ४० टक्क्यांवर असलेली आर्द्रता सायंकाळी २६ पर्यंत घटली. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथेही ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपुरातही तापमानाचा पारा ०.९ अंश सेल्सिअसने वाढून ४३.९ वर पोहोचला. यामुळे दिवसभर उष्णता जाणवत होती. शहरात सकाळी ५७ टक्के आर्द्रता होती. सायंकाळनंतर परिसरात तुरळक पाऊस झाल्याने वातावरण थंडावले. त्यामुळे सायंकाळची आर्द्रता दोन टक्क्यांनी वाढून ५९ वर गेली.
विदर्भात चंद्रपूर सर्वाधिक तापलेला तर बुलडाणा सर्वात कमी ३७.८ अंश सेल्सिअसवर होता. या सोबतच गडचिरोली ४१, अमरावती ४१.६, अकोला ४२.२, वर्धा आणि गोंदिया ४२.५ असे तापमान नोंदविले गेले. अमरावतीमध्ये तापमानात १.६ अंश सेल्सिअस, तर गोंदीया आणि ब्रह्मपुरी १ अंश सेल्सिअसने वाढ नोंदविली गेली.