हायकोर्ट वकील परिसराचा होतोय ‘मेकओव्हर’
By Admin | Updated: June 5, 2017 02:06 IST2017-06-05T02:06:21+5:302017-06-05T02:06:21+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील परिसराचा पूर्णपणे ‘मेकओव्हर’ करण्यात आला आहे.

हायकोर्ट वकील परिसराचा होतोय ‘मेकओव्हर’
आकर्षक नूतनीकरण : नवीन कार्यकारिणीची दमदार सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील परिसराचा पूर्णपणे ‘मेकओव्हर’ करण्यात आला आहे. आकर्षक नूतनीकरणामुळे परिसराला ‘कॉर्पोरेट लूक’ प्राप्त झाला आहे. आपण आधी पाहत होतो, तो परिसर हाच का? असा प्रश्न येथे येणाऱ्याला पडत आहे.
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या नवीन कार्यकारिणीने अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात या कामांद्वारे आपल्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील एका भागात खासगी व सरकारी वकिलांना बसण्यासाठी खोल्या, संघटनेचे उपाहारगृह, ग्रंथालय, टंकलेखक, स्टॅम्प विक्रेते, झेरॉक्स, स्टेशनरी इत्यादी बाबी आहेत. संघटनेने तळमाळ्यातील परिसराचे देखणे नूतनीकरण केले आहे. छताला पीओपी करून लाईटस् लावण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वारापुढील परिसराला विशेष सजविण्यात आले आहे. राज्यघटनेतील प्रस्तावना कोरलेली शिला या परिसरात बसविण्यात आली आहे. उपाहारगृहाचाही चेहरामोहरा बदलविण्यात आला आहे.
पक्षकारांसाठी प्रतीक्षालय व माहिती कक्ष तयार करण्यात आले आहे. अॅड. किलोर यांनी यासंदर्भात बोलताना ही केवळ सुरुवात असल्याचे सांगितले. न्यायालय, वकील व पक्षकारांच्या सुविधांच्या बाबतीत संघटनेकडे आणखी अनेक योजना असून त्यावर येत्या काळात तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन
राज्यघटनेतील प्रस्तावना कोरलेल्या शिलेचे न्यायमूर्ती भूषण गवई, प्रवेशद्वारापुढील परिसराचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी तर, उपाहारगृहाचे न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने न्या. प्रसन्न वराळे, न्या. रवी देशपांडे, न्या. झेड. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. इंदिरा जैन, न्या. स्वप्ना जोशी, सहायक सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर उपस्थित होते.
वकिलांना
जाण्यायेण्यासाठी व्हॅन
अनेक वकिलांना प्रकरणांवरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयातून जिल्हा न्यायालयात व जिल्हा न्यायालयातून उच्च न्यायालयात जावे लागते. अशा वकिलांच्या सुविधेसाठी अॅड. अतुल पांडे यांनी आजोबा केशवराव पांडे (तिरोडा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संघटनेला व्हॅन भेट दिली. या व्हॅनमधून वकिलांना उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात नि:शुल्क जाणेयेणे करता येईल. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते व्हॅन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. अॅड. अतुल पांडे यांचे वडील पद्माकर व आई नीलिमा यांनी व्हॅनच्या चाव्या संघटनेच्या सुपूर्द केल्या.