हायकोर्टात अडली जि.प. निवडणूक
By Admin | Updated: January 12, 2017 01:35 IST2017-01-12T01:35:17+5:302017-01-12T01:35:17+5:30
जिल्हा प्रशासनाने २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जय्यत तयारी केली होती.

हायकोर्टात अडली जि.प. निवडणूक
पारशिवनी, वानाडोंगरी सर्कलचा घोळ : कुठे समाधान, कुठे निराशा
नागपूर : जिल्हा प्रशासनाने २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. परंतु जिल्हा परिषद सर्कल पारशिवनी आणि वानाडोंगरी यावर न्यायालयात आक्षेप घेण्यात आला आहे. न्यायालयात यावर सुनावणी प्रलंबित असल्यामुळे निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे मार्च २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. जिल्हा प्रशासनानेसुद्धा त्या दृष्टिकोनातून तयारी केली होती. सर्कलची पुनर्रचना, आरक्षणाच्या सोडतीसुद्धा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य व इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. उमेदवारांचा मेळावे, बैठका आणि प्रचार-प्रसार सुरू झाला होता. जिल्हा भाजपासह जिल्हा काँग्रेसही कामाला लागली होती. मंगळवारी आलेल्या नगर परिषदेच्या निकालामुळे दोन्ही पक्षांमध्ये आणखी उत्सुकता वाढली होती.
परंतु जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करताना निवडणूक आयोगाने पारशिवनी व वानाडोंगरी या सर्कलमध्ये यापूर्वीच नगर पंचायत व नगर परिषद घोषित झाल्यानंतरही सर्कलची रचना करताना विचारात घेतले नाही. त्यामुळे येथे नगर परिषदेची की जिल्हा परिषदेची निवडणूक घ्यावी, हा संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आक्षेप घेण्यात आला. या प्रकरणावर सध्या सुनावणीदेखील सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित करताना नागपूर जिल्हा परिषदेला मात्र वगळले असल्याचे दिसते आहे.
सध्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे २१, शिवसेना ८, काँग्रेस १९, राष्ट्रवादी ७, गोंडवाना गणतंत्र पार्टी १, आरपीआय १ व बसपाचा १ सदस्य आहे. अध्यक्ष भाजपाचे असून, उपाध्यक्ष शिवसेनेचा आहे. निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये विद्यमान ९० टक्के सदस्यांना फटका बसला होता. पुनर्रचनेत काहींचे मतदारसंघच गायब झाले होते.
उपाध्यक्ष शरद डोणेकर व माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांचेही सर्कल राखीव झाल्याने ते रिंगणातून बाद झाल्यासारखेच होते. अध्यक्ष निशा सावरकर, माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे यांचे सर्कल कायम होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार तर नाही ना, अशी भीती काही सदस्यांना आहे तर काही सदस्यांनी संपूर्ण प्रक्रियेतच बदल व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)