हायकोर्टाने मुंबईतील आरोपीला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:12 IST2020-03-28T00:11:35+5:302020-03-28T00:12:35+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.

हायकोर्टाने मुंबईतील आरोपीला जामीन नाकारला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
हेमंत व्रजलाल झवेरी असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील रहिवासी आहे. हा आरोपी नागरिकांची नेहमीच फसवणूक करतो. त्याला या गुन्ह्याची सवय आहे. २२ जून २०१८ रोजी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, त्याने न्यायालयात दिलेल्या हमीचे पालन केले नाही. त्याने तक्रारकर्ते मनीष देशराज यांचे पैसे परत केले नाही असे पोलिसांनी अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. आरोपीने पैसे दिल्याचा दावा केला व त्यासंदर्भात काही पावत्या सादर केल्या. देशराज यांनी आरोपीचा दावा अमान्य केला. तसेच पावत्यांवरील स्वाक्षरी खोटी असल्याचे सांगितले. शेवटी न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आणि आरोपीने सादर केलेल्या पावत्या पुढील तपासाकरिता पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांच्या स्वाधीन केल्या. तसेच, देशराज यांना यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची मुभा दिली.