केंद्र सरकारला हायकोर्टाची अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST2020-12-11T04:26:48+5:302020-12-11T04:26:48+5:30
नागपूर : जनआरोग्य योजनेंतर्गत दुर्धर आजारावरील उपचारासाठी वैद्यकीय मदत देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

केंद्र सरकारला हायकोर्टाची अवमानना नोटीस
नागपूर : जनआरोग्य योजनेंतर्गत दुर्धर आजारावरील उपचारासाठी वैद्यकीय मदत देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातील अतिरिक्त प्रधान सचिव सदानंद, सहायक सचिव आगम मित्तल व राज्य आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना अवमान नोटीस बजावून १७ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यवतमाळ येथील चैतन्य प्रकाश अवथरे हे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना जेनेटीक आजार झाल्याने उपचारासाठी प्रचंड खर्च येणार होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या जनआरोग्य योजनेंतर्गत वैद्यकीय मदत मिळावी, अशी याचिका उच्च न्यायालयात २०१८ मध्ये दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते हे बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे पुत्र आहेत. ते दारिद्र्यरेषेखालील नाहीत, त्यामुळे योजनेचा लाभ देता येणार नाही, असे कारण केंद्र सरकारने पुढे केले. परंतु, हायकोर्टाने याचिकाकर्त्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांना वैद्यकीय मदत देण्याचा आदेश केद्र व राज्य सरकारला दिला होता. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.