वन विभागाला ‘हाय अलर्ट’
By Admin | Updated: November 21, 2015 03:17 IST2015-11-21T03:17:16+5:302015-11-21T03:17:16+5:30
दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातील कुख्यात ‘बहेलिया’ टोळी पुन्हा विदर्भात सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वन विभागाला ‘हाय अलर्ट’
आरोपीचे छायाचित्र जारी : शिकाऱ्यांकडून वाघाला धोका
नागपूर : दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातील कुख्यात ‘बहेलिया’ टोळी पुन्हा विदर्भात सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंबंधी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) संपूर्ण राज्यासह नागपूर वन विभागाला ‘हाय अर्लट’ जारी केला आहे.
डब्ल्यूसीसीबीने या ‘हाय अर्लट’ सह वन विभागाला कुख्यात शिकारी भिमा बावरिया (वय ४५ वर्षे) याचे छायाचित्र पाठवून सावध राहण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार नागपूर वन विभागाने कंबर कसली असून, पेंच, बोर व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांसह मानसिंगदेव आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात गस्त वाढविण्यात आली आहे. भिमा बावरिया हा कुख्यात शिकारी आहे. त्याला यापूर्वी दिल्ली येथून तीन ते चार वेळा अटक करण्यात आली आहे. परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी तो जमानतीवर बाहेर आला असून, आता मध्यप्रदेश आणि विदर्भात सक्रिय झाला असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी नागपूर वन विभागाने वाघाच्या शिकारी प्रकरणात ‘बहेलिया’ टोळीतील सुमारे ५० पेक्षा अधिक आरोपींना गजाआड केले होते.