येथे होतो गर्भाशयाचा सौदा
By Admin | Updated: July 6, 2015 03:21 IST2015-07-06T03:21:28+5:302015-07-06T03:21:28+5:30
गरिबीमुळे एका गर्भवती महिलेने आपल्या गर्भाशयाचा व्यवहार केला. पण मुलाला जन्म दिल्यानंतर मात्र या मातेची ममता जागृत झाली आणि आता ती स्वत:चे अपत्य विकण्यास तयार नाही.

येथे होतो गर्भाशयाचा सौदा
२५ हजार रुपयात चिमुकल्यांचा सौदा आर्थिक तंगीमुळे असहाय माता मेयो रुग्णालय झाले साक्षीदार
जगदीश जोशी नागपूर
गरिबीमुळे एका गर्भवती महिलेने आपल्या गर्भाशयाचा व्यवहार केला. पण मुलाला जन्म दिल्यानंतर मात्र या मातेची ममता जागृत झाली आणि आता ती स्वत:चे अपत्य विकण्यास तयार नाही. तिला स्वत:च्या मुलाला विक्रीसाठी बाध्य करणाऱ्या एका दलालाने ग्राहकाशी आर्थिक व्यवहारही केला. आपला व्यवहार फिस्कटताना पाहून दलालाने चिमुकल्याचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे ती माता भयभीत आहे. या घटनेने उपराजधानीत संघटित पद्धतीने गर्भाशयाचा व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न लोकमतने केला असता शहरात मोठ्या प्रमाणावर मुलांची खरेदी - विक्री करणाऱ्या टोळीचा पत्ता लागला आहे.
माझे कुणीच नाही, साहेब
आपली व्यथा सांगताना त्या महिलेला रडू कोसळले. तिचे म्हणणे होते की, मुलांना उपाशी झोपविण्यापेक्षा कोणत्या गरजू दाम्पत्याकडे सोपविल्यास त्यांच्या जेवणाचा प्रश्न मिटेल. या आशेने सोनूच्या बोलण्यात फसली. ती म्हणाली, माझे कुणीच नाही, साहेब. मजबुरीने सोनूला होकार दिला. परंतु आता तसे करायचे नाही, असेही ती म्हणाली. पैसे नसल्याने तिने सिलेंडरही गहाण ठेवले आहे. प्रसूतीच्या दरम्यान तिसरी शस्त्रक्रिया असल्याने तिची प्रकृती ढासळली. मूल विकत घेणारे तिच्यावर सुटी टाकण्यासाठी दबाव टाकत आहे.
जयताळा येथे राहणाऱ्या या महिलेचा पती बेरोजगार आहे. त्याला आधीपासूनच एक मुलगा आणि एक मुलगी आहे. महिला एका कॅटरर्समध्ये काम करते. रोज काम मिळत नसल्याने तिची आर्थिक स्थिती नाजूक आहे. चार महिन्यापूर्वी या गर्भवती महिलेने तिसऱ्या मुलाचा सांभाळ करण्याची असमर्थता तिच्या मैत्रिणीकडे बोलून दाखविली आणि गर्भपात करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या मैत्रिणीने तिची ओळख सोनू नामक व्यक्तीशी करून दिली. सोनू गरीब मुलींची दुसऱ्या राज्यातील युवकांशी फसवून लग्न करून देणाऱ्या टोळीशी जुळला आहे. सोनूने या महिलेला निपुत्रिक असलेले दाम्पत्य आपल्या संपर्कात असून त्यांच्याकडून प्रसूतीच्या काळातला खर्च आणि होणाऱ्या मुलाच्या मोबदल्यात २५ हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम मिळवून देण्याचे आमिष दिले. गर्भपात करण्यापेक्षा मुलाला जन्म देऊन त्याच्या मोबदल्यात पैसे मिळविण्याची लालसा या महिलेच्या मनात त्यावेळी आली.
सोनूने त्या महिलेला नारा येथील लक्ष्मीबाई यांच्याकडे सोपविले. सोनूने लक्ष्मीबाईशी मुलाखत करण्याची किंमतही वसूल केली. लक्ष्मीबाईने त्या महिलेला १२ दिवस आसरा दिला. त्यानंतर तिने आपल्या बहिणीला मुलाचे खरेदीदार म्हणून समोर केले. यानंतर सोनूने त्या महिलेला नंदनवनच्या किरण यांच्याकडे ठेवले. त्याने किरणकडूनही किंमत वसूल केली. महिला किरणसोबत जवळपास दोन महिने होती.
एक महिन्यापूर्वी अचानक लक्ष्मीबाई सोनूच्या माध्यमातून या महिलेला भेटायला नंदनवन येथे किरणच्या घरी आली. त्यानंतर लक्ष्मीबाई पुन्हा त्या महिलेला आपल्या निवासस्थानी घेऊन गेली. प्रसुती होण्याच्या एक आठवड्यापूर्वी लक्ष्मीबाईने महिलेला मेयो रुग्णालयात दाखल केले. या महिलेने बुधवारी मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याचे पाहून लक्ष्मीबाईला आनंद झाला.
मुलाला घरी आणण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. शनिवारी रुग्णालयातून महिलेला सुटी मिळावी म्हणून लक्ष्मीने प्रयत्न केले. याचा सुगावा लागल्याने किरणही आपल्या साथीदारांसह रुग्णालयात पोहचून मुलावर दावा ठोकला. तत्पूर्वी या महिलेला तिच्या शिशूसह घरी नेण्याची तयारी लक्ष्मीने केली होती. दारू विक्रीच्या संदर्भात जुळलेली किरण लक्ष्मीच्या तुलनेत संपन्न आहे. दोघांनीही शिशुवर दावा ठोकल्याने रुग्णालयातच त्यांच्यात भांडण लागले.
पाच दिवसांपासून आपल्या छातीशी कवटाळलेल्या या मातेची ममता येथे जागृत झाली. तिने सोनू, किरण आणि लक्ष्मी यांच्याशी बंड करण्याचा निर्धार केला.
शिशु न मिळण्याची शक्यता लक्षा घेत लक्ष्मी, किरण आणि जलाल सोनू यांचे महिलेशी भांडण सुरु झाले. किरण आणि लक्ष्मीने महिलेच्या उपचार आणि देखभालीसाठी सोनूला दिलेला खर्च आणि अग्रीम निधी परत करण्याची मागणी केली.
यानंतर सोनू महिलेला धमकी द्यायला लागला. आपल्याजवळ अनेक गुन्हेगार असून चिमुकल्याला आपल्या हवाली करण्याची धमकी द्यायला लागला. रुग्णालयातून चिमुकल्या अपत्याला घेऊन बाहेर पडू देणार नाही म्हणून सोनूने महिलेवर दबाव टाकला. या धमकीने महिला घाबरली. यानंतर काही अकल्पित घडू नये म्हणून तिने चूप राहणे पसंत केले.