...येथे मिळतो विकतचा आजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:18 IST2018-03-20T00:17:43+5:302018-03-20T00:18:14+5:30

रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत.

Here is the diseases by buying the cost! | ...येथे मिळतो विकतचा आजार !

...येथे मिळतो विकतचा आजार !

ठळक मुद्देलोकमत स्टिंग आॅपरेशनरस्त्यावर शिजते अन्नदूषित व उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्य धोक्यातरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सचे धक्कादायक चित्र

लोकमत न्यूज नेटवर्क
सुमेध वाघमारे/दयानंद पाईकराव
नागपूर : रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत. आजार देणारे हे हॉटेल्स सर्वांदेखत सुरू असतानाही प्रशासन मात्र मूकदर्शक बनले आहे.
सोमवारी ‘लोकमत’ चमूने या गंभीर प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या हॉटेल्सचालकांचे चांगलेच फावत असल्याचे वास्तव समोर आले.
एकाच ठिकाणी ४० वर हॉटेल्स
मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या समोरील पुलाखालील साधारण ४० वर छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. नागपुरात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत हॉटेल्स असणारे हे एकमेव ठिकाण आहे. परंतु यातील दोन-चार हॉटेल्स सोडल्यास इतर सर्व हॉटेल्समध्ये अस्वच्छता, घाण, उघड्यावर खाद्यपदार्थ, उघडे किचन असेच दृश्य ‘लोकमत’चमूला दिसून आले. जिथे उभे राहणेही किळसवाणे आहे, तिथे लोक पैसे देऊन जेवत होती.
बहुसंख्य हॉटेल्सचे किचन रस्त्यावरच
रेल्वे स्थानकासमोरील बहुसंख्य हॉटेल्स चालकांनी खाद्यपदार्थ शिजविण्यासाठी रस्त्यावरच भट्टी लावलेली आहे. त्यामुळे फोडणी देताना सगळे पदार्थ रस्त्याच्या शेजारीच ठेवून सगळी प्रक्रिया पार पाडते. वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ उडून अन्नात मिसळते. हेच धुळीत शिजविलेले अन्न हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या थाळीत येते.
भाज्यापासून अन्नही उघड्यावरच
रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये काऊंटरवर दर्शनी भागात फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, टमाटर या भाज्यांचे उघड्यावरच प्रदर्शन लावले जाते. दिवसभर रस्त्यावरील धूळ उडून या भाज्यांवर साचते. मग एखादा ग्राहक आला की लगेच त्याच्यासमोर ताजी चिरलेली भाजी करण्याचा आव आणून न धुताच या भाज्या कापून त्यांना फोडणी दिली जाते.
 शिजलेला भात फूटपाथवर
एका हॉटेलमध्ये तर कमालीचा बेजबाबदारपणा पाहावयास मिळाला. या हॉटेलमधील कर्मचारी शिजण्यासाठी टाकलेल्या भातातील पाणी काढून टाकण्यासाठी एका गाळणीत शिजलेला भात टाकला. ही गाळणी तशीच फूटपाथवर ठेवली. पाणी निघून जाईपर्यंत हा भात तसाच फूटपाथवर होता. त्याच्या शेजारून लोकांची ये-जा सुरू होती.
मद्यपींसाठी विशेष सोय
रेल्वे स्थानकासमोरील काही हॉटेल्समध्ये मद्यपींसाठी विशेष सोय केली आहे. ही माहिती देण्यासाठी हॉटेलसमोरच काही माणसांना उभे केले आहे. यामुळे ही हॉटेल्स मिनी बीअर बार झाली आहेत. काहीमध्ये लपूनछपून तर काहींमधून सर्रास दारू पिणारे दिसून आले.
हॉटेलचा आत आणि बाहेरचा परिसरही अस्वच्छ
हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारी मंडळी नीटनेटकी तथा स्वच्छतेला प्राधान्य देणारी असावीत. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्वयंपाकगृह नियमित चकचकीत असायला हवे. ज्या ताट-वाट्यांमध्ये ग्राहकांना जेवण दिले जाते, त्या स्वच्छ पाण्याने धुतलेली असावीत. पाण्याचे ग्लासही आतून-बाहेरून स्वच्छ असायला हवे. परंतु रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सला पाहून ‘स्वच्छ’ कशाला म्हणतात, हा प्रश्न पडतो. येथे हॉटेलच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणचा परिसर अस्वच्छ आहे.

Web Title: Here is the diseases by buying the cost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.