पत्नीला छळणाऱ्या पतीला कारावास

By Admin | Updated: October 17, 2014 01:04 IST2014-10-17T01:04:08+5:302014-10-17T01:04:08+5:30

पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या एका पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर अन्य

Her husband imprisoned | पत्नीला छळणाऱ्या पतीला कारावास

पत्नीला छळणाऱ्या पतीला कारावास

नागपूर : पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या एका पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर अन्य तीन जणांची निर्दोष सुटका केली.
अमोल मधुकर धामणकर (३१) रा. वैशालीनगर पाचपावली, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कुसुम मधुकर धामणकर (६०), शैलेश मधुकर धामणकर (३५) आणि राखी शैलेश धामणकर (३१), अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अमोल हा व्यावसायिक असून त्याचा विवाह २००८ मध्ये ओंकारनगर मानेवाडा येथील सोनालीसोबत झाला होता. त्यांना सोहन नावाचा मुलगाही झाला. पुढे २०१० पासून सोनालीच्या छळाला सुरुवात झाली. सोनालीने माहेरहून दोन लाख रुपये आणावे, असा तकादा लावण्यात आला होता. ती दुसऱ्यांदा गरोदर असताना लाथ मारून तिचा गर्भपात करण्यात आला होता. छळाबाबतची तक्रार सोनालीने महिला सेलकडे केली होती. परंतु कोणताही समझोता घडून न आल्याने सोनालीचा पती अमोल, सासू कुसुम, दीर शैलेश आणि जाऊ राखी यांच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात २७ जून २०१३ रोजी भादंविच्या ४९८ (अ), ३१५, ५०६ (ब), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उज्ज्वला देवकर यांनी करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. छळाचा गुन्हा सिद्ध होऊन अमोल धामणकर याला शिक्षा सुनावण्यात आली तर इतरांची सर्व गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. दुरुगकर यांनी काम पाहिले. हे.कॉ. सुरेश शेंडे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Her husband imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.